Thackeray Brothers : ५ जुलैच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवा अध्याय संपूर्ण राज्याने अनुभवला. कारण या दिवशी १९ वर्षांनी एक गोष्ट घडली ती गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकाच मंचावर येणं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याचेही संकेत दिले आहेत. दरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत पण त्यांची युती होणार नाही आणि झाली तरीही फार काळ टिकणार नाही असं म्हटलं आहे.
काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?
मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का?, हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल असतो, असे म्हणत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी हिंदी-मराठीच्या भाषेवर आपली थेट प्रतिक्रिया दिली. ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले होते, ठाकरे मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असे म्हणत सरस्वती महाराजांनी ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरुन परखडपणे भूमिका मांडली.
राज आणि उद्धव ठाकरे यांची युती यशस्वी होणार नाही-अविमुक्तेश्वरानंद
“ठाकरेंबाबत मी काही व्यक्तिगत भाष्य करणार नाही. मात्र या दोघांची युती यशस्वी होईल असं वाटत नाही. कारण राज ठाकरे यांचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. तसंच उद्धव ठाकरेंचे जे सहकारी सध्या आहेत त्यांचीही धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे हे दोन बंधू एकसाथ जास्त काळ चालू शकणार नाहीत. कारण राज ठाकरे एका समाजाला घेऊन चालतात. उद्धव ठाकरे आता सर्वसमावेशक विचारांचे झाले आहेत. त्यात काही चूक नाही. काळानुरुप अशा भूमिका राजकारणात बदलत असतात. हिंदीला विरोध, मराठीचा आग्रह हा त्यांचा विषयच नाही. या सगळ्यातून ते राजकारणच करत आहेत आणि ते सगळ्यांना समजतंय.” अविमुक्तेश्वरानंद यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ठाकरे महाराष्ट्रातले नाहीत, मगधहून आले आहेत
मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा-पणजोबांनी जे लिहून ठेवलंय त्यात हे म्हटलं आहे की आम्ही मगधहून आलो होतो. मगधहून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं. त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबाडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? राज ठाकरे जे म्हणाले आहेत की मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत ठेवून द्या पण व्हिडीओ काढून नका. एक माणूस खुलेआम गुन्हा करायला सांगतो आणि पुरावे ठेवू नका म्हणतो आहे. याची दखल सरकारने घेतली पाहिजे असंही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.