२०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे-भाजपा युतीकडून राजकीय समीकरणं जुळवली जात आहेत. २०२४ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. २०२४ नंतर मुख्यमंत्री कोण असतील? यावर शिंदे गट आणि भाजपा यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं होतं.

अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, २०२४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजपा युती निवडणूक लढेल. पण फडणवीसांच्या विधानाच्या विरोधी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली होती. २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण असतील, ते आताच ठरवलं जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री कोण असेल? हे केंद्रीय नेते ठरवतील, असंही बावनकुळे म्हणाले होते.

हेही वाचा- राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली? अजित पवारांच्या बंडखोरीबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

तर दुसरीकडे, २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल. एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील अशी अपेक्षा आहे, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. यावर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांना घरी बसवण्याची भाजपानं तयारी केली आहे, असं विधान शरद कोळी यांनी केलं. ते उल्हासनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार? एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान फडणवीसांचं थेट विधान

“२०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल” या दीपक केसरकरांच्या विधानाबाबत विचारलं असता शरद कोळी म्हणाले, “याचा अर्थ एकनाथ शिंदेंचं गबाळ आता बांधलं आहे. भाजपाने एकनाथ शिंदेंना घरी बसवायची तयारी केली आहे.”