शेतीसाठी महत्त्वाच्या परभणी जिल्ह्यात धान्याचे कोठार होण्याची क्षमता आहे. पण सध्या जिल्ह्यात चाललेले राजकारण अशोभनीय आहे. या प्रवृत्ती व जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा बदलण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. साखर कारखाने व सहकारी बँका उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींपासून परभणी जिल्ह्य़ास वाचवा, असे आवाहनही पवारांनी केले.
राष्ट्रवादीच्या चारही मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पवार यांची ज्ञानोपासक महाविद्यालय मदानावर सभा झाली. उमेदवार प्रताप देशमुख (परभणी), डॉ. मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), बाबाजानी दुर्राणी (पाथरी) व विजय भांबळे (जिंतुर), माजी मंत्री फौजिया खान, माजी खासदार गणेश दुधगावकर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणाचा चेहरा बदलण्याची गरज असून सामान्य व प्रामाणिक माणसाच्या हिताची काळजी करणारे नेतृत्व उभे करायचे आहे. जिल्ह्यातील एका आमदाराला जिल्ह्याच्या मुख्यालयी न्यायालयाची परवानगी असल्याशिवाय प्रवेश करता येत नाही, ही बाब अशोभनीय आहे अशी टीका त्यांनी रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव न घेता केली. सहकार चळवळीला आम्ही शक्ती दिली. परंतु सहकार चळवळ उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांपासून या जिल्ह्य़ास वाचवण्याची वेळ आली आहे. सहकारी कारखाने, बँका उद्ध्वस्त करणाऱ्यांना बाजूला सारून जिल्ह्य़ाचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे, असे सांगताना पवारांचा रोख वरपुडकरांवरही होता. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक केली नाही. शेतीमालाचे उत्पादन करणारा शेतकरी संकटात आहे. एलबीटी, बेरोजगारी, शैक्षणिक चळवळ व शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक येत्या काळात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
महापौर देशमुख यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांचा आलेख मांडून घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे सांगितले. शहरात एलबीटी व जकातही नको. नवीन महापालिकांना विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी केली. भांबळे यांनी गोदावरीवर बंधारे, लोअर दुधना प्रकल्प, १३३ केव्ही वीजकेंद्र निर्मिती आदी बाबी अजित पवारांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाल्याचे सांगितले. भांबळे यांनी वरपुडकर यांनी पक्ष सोडल्याबद्दल बरे झाले, सोडून गेले. आमची पिडा गेली, अशी टिप्पणी केली, तर बाबाजानी यांनी राष्ट्रवादी डुप्लिकेट राहिली नाही. आता ती ‘प्युअर’ झाली, असा टोमणा मारला. सुरेश जाधव, दुधगावकर, रामराव वडकुते यांची भाषणे झाली. मातंग समाज नेते बाबासाहेब गोपले, जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, स्वराजसिंह परिहार, माजी आमदार व्यंकटराव कदम, भीमराव हत्तीअंबीरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक आदी उपस्थित होते. माजी सभापती प्रकाश ढोणे व शिवाजी शेरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
‘गंगाखेडसारखी निवडणूक पाहिली नाही’
गंगाखेड मतदारसंघाबद्दलही पवारांनी खास शैलीत टिप्पणी केली. गंगाखेडची निवडणूक अजब आहे. आपण १४ निवडणुका लढवल्या व जिंकल्या. पण गंगाखेडसारखी निवडणूक पाहिली नाही. मतदानाआधी महिना, पंधरा दिवसांनी यायचे आणि सगळी व्यवस्था करायची. त्यानंतर ५ वष्रे गायब व्हायचे, असा प्रकार कुठेही शोधून सापडणार नाही. आपल्या सर्वाचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे हे चित्र बदलले पाहिजे, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2014 रोजी प्रकाशित
कारखाने, बँका उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींपासून परभणीला वाचवा – पवार
साखर कारखाने व सहकारी बँका उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींपासून परभणी जिल्ह्य़ास वाचवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

First published on: 08-10-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar canvassing in parbhani