उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि खासदार शरद पवार समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. दरम्यान, या बंडानंतर अजित पवार शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) इतर नेत्यांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. बारामतीत बोलताना त्यांनी थेट पवार कुटुंबावर भाष्य केले. मला एकटं पाडलं जाईल. तुम्हाला भावनिक केलं जाईल. पण भावनिक झाल्यामुळे पोट भरत नाही. रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. मतदारांना भावनिक करण्याचा प्रश्नच नाही. अजित पवार हेच लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला. ते पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

“भावनिक आवाहन करण्याची गरज नाही”

“भावनात्मक आवाहन करण्याचे कारण नाही. कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्षे ओळखतात. तेव्हा आम्हाला भावनिक आवाहन करण्याची गरज नाही. पण विरोधकांची भूमिका मांडण्याची पद्धत, त्यांची भाषणं काहीतरी वेगळंच सांगत आहेत. त्याची नोंद बारामतीचा समस्त मतदार घेईल. योग्य तो निर्णय घेईल,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

“लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न”

बारामतीच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार कुटुंबावर भाष्य केले. मला एकटं पाडण्यासाठी काहीजण जीवाचं रान करतील, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. “एखाद्या उमेदवाराला मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही केले असेल तर हरकत नाही. पण एका कुटुंबातील संपूर्ण लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे असे सांगणे म्हणजे भावनिक भूमिका मांडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे,” असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते?

“आमच्या घरातील शरद पवार हे एकमेव वरिष्ठ आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या घरातले बाकीचे सगळे माझ्या विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण…”

या निवडणुकीत तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तुम्ही विचलित होऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. “मला तुमची साथ आहे. तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही जोपर्यंत एकजूट आहात तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो. काहीजण तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक झाल्याने कामं होत नाहीत. काम हे तडफेनेच करावे लागते. पूर्ण जोर लावूनच काम करावे लागते,” असेही अजित पवार म्हणाले होते.