असं म्हणतात की एक फोटो हजार शब्दांचं काम करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे ती अशाच एका फोटोची. या फोटोत शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदाणी एकाच फोटोत दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. एका लग्न सोहळ्यात हे तीन दिग्गज एकत्र आल्याचं पाहण्यास मिळालं.

कुठल्या कार्यक्रमात तीन दिग्गज एकत्र?

आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभात हे तीन दिग्गज एकत्र आले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला. शरद पवार यांनी म्हटलं आहे की, ‘प्रवीण पवार यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थित राहिलो. नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली आहे. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदाणी बसलेले आहेत. तर, बाजूलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही बसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटीझन्स कमेंट करुन मजा घेत आहेत. तुमच्या पोस्टमध्ये गौतम अदाणींचा का उल्लेख केला नाही? असा सवाल कमेंट करुन विचारला जात आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांनी लग्न सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यातला शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो चर्चेत आला आहे.

शरद पवार बेरजेचं राजकारण करणारे नेते

शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसंच शरद पवार हे बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधक म्हणून ते सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपावर सातत्याने टीकाही करताना दिसून येतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पार्थ पवार प्रकरणावरही मुख्यमंत्र्यांनी जे काही आहे ते स्पष्ट केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली होती. तसंच याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानातील निवडणुकीवरुन त्यांचं कौतुकही केलं होतं. तर, गौतम अदाणी यांच्याशीही शरद पवारांची जवळीक आहे. त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातही गौतम अदाणींच्या नावाचा उल्लेख आहे. आता लग्नातील या फोटोमुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राजकारणावर चर्चा होत आहे.