राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. ते मंगळवारी (२ मे) मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले असले तरी त्यांनी पक्षाची सूत्रं काही महत्त्वाच्या नेत्यांकडे दिली आहेत. तसेच पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी पवारांनी एक समिती गठीत करण्याची सुचना केली आहे. पवारांनी यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राने आणि आपण सर्वांनी मला खंबीर साथ आणि प्रेम दिलं. हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो.

शरद पवारांनी या समितीत काही नेत्यांची नावं सूचवली आहेत. हे नेते पक्षाच्या पुढील अध्यक्षाबाबतचा निर्णय घेतील. पवारांनी या समितीसाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनील देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड या प्रमुख नेत्यांची नावं सुचवली आहेत. या नेत्यांसह त्यांनी इतरही काही सदस्यांची नावं सुचवली आहेत. त्यामध्ये फौजिया खान (अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस) आणि सोनिया दूहन, (अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस) यांचा समावेश आहे.

ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.