राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आपल्या गटात समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ५ जुलै रोजी पार पडलेल्या मेळाव्यात बहुसंख्य आमदार अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर अवघे १३ आमदार शरद पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

५ जुलै रोजीचा मेळावा पार पडल्यानंतर शरद पवारांच्या मेळाव्यात उपस्थित असलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सायंकाळी अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर आता शरद पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे अजित पवारांना पाठिंबा देण्याचा विचार करत आहेत. याबाबतची माहिती स्वत: आमदार शिंगणे यांनी दिली.

हेही वाचा- “अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार हसून एकच वाक्य बोलले, ते म्हणजे…”, रोहित पवारांचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या गटात जाण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राजेंद्र शिंगणे म्हणाले, “अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी मला दोन-तीन वेळा त्यांना पाठिंबा देण्याबद्दल विचारलं आहे. मी जर त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्यांना जर सहाकार्य केलं, तर सरकारकडून जिल्हा सहकारी बँकेला पूर्णपणे मदत मिळवून देऊ, असं आश्वासन त्यांनी (अजित पवार) मला दिलं आहे. अशा परिस्थितीत मी अजित पवारांना पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. अजून पूर्णपणे निर्णय घेतला नाही. अजित पवारांना यामध्ये साथ देऊन जिल्हा सहकारी बँकेचं पूर्णपणे पुनर्वसन करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.”