केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे.

कार्यक्रमाचा खास टिझर प्रदर्शित

शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आलीय. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय.

Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…
paras and chirag paswan
भाजपाचा फॉर्म्युला ठरला; केंद्रीय मंत्री पशुपती पारस NDAतून बाहेर, पक्षाच्या अडचणी वाढणार?
loksatta analysis maharashtra cm eknath shinde firm on tickets for all 13 sitting mps
विश्लेषण : मोदी, शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखला जाईल? जागावाटपाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला…

छत्रपती शिवरायांच्या साथीने….

शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आलीय. या टिझरला खासदार अमोल कोल्हे यांचा आवाज आहे. “आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचाअनावरण सोहळा २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया,’ असं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. या कार्यक्रमाला शरदपवार गटाचे अनेक नेते, कार्यकर्ते हजेरी लावण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसंच, अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते. परंतु, त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही. तर, निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे.