‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे पवार यांनी हे नको व्हायला होतं. पण हे झालं आहे. आता झालं ते झालं याची चर्चा बंद करुन नवं काय करता येईल त्याची चर्चा करु असं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: “महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत…”; ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; गुजरातला प्राधान्य का? याचंही दिलं उत्तर

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना पहिलाच प्रश्न ‘वेदान्त-फॉक्सकॉन’संदर्भात विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, “हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय (गुजरातला नेण्याचा) बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असं व्हायला नको होतं. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही,” असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Vedanta Foxconn Project: १ लाख ६६ हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात वाद; PM मोदी म्हणाले, “हा करार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवलं आहे. यावरही पवार यांनी भाष्य केलं. “मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांचं वक्तव्य असं होतं की मागच्या राजवटीत यावर निर्णय घेतला नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत, एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप केले. मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही. पंतप्रधानांच्या भेटीची चर्चा झाली. ते मदत करतील, तर आनंद आहे. पण आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं म्हणतायत,” असं सांगत शरद पवार यांनी एक उदाहरण दिलं. “एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं म्हणणं असा हा प्रकार आहे,” असा टोला पवारांनी लगावला.