सांगली : अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहेच, याचबरोबर कायदेमंडळात अधिवेशन काळात रमी खेळत असल्याचे दिसून आले. यामुळे राज्यातील जनतेकडून त्यांच्याविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. कृषिमंत्री कोकाटे हे जनतेने त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रति गांभीर्याने न वागता त्याविरुद्ध वर्तन करीत असून, त्यांची मंत्रिपदापासून सुरू झालेली कारकीर्द ही अधिकाधिक वादग्रस्त होत चाललेली आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या वेळी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनावेळी आमदार अरुण लाड यांच्यासह जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.