गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांवर आणि त्यांच्या बहिणींच्या व्यवसायांवर देखील आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येत आहेत. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांकडचे ‘सरकारी पाहुणे’!

आयकर विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, “मला कळलं की काल अजित पवारांकडे सरकारने काही पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते!”

लखीमपूर खेरी घटनेवरून शरद पवारांचं केंद्रावर टीकास्त्र, म्हणाले, “शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप…!”

“..आणि लोकांनी भाजपाला वेडी ठरवलं!”

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांना ईडीनं पाठवलेल्या नोटिसचा देखील उल्लेख करत भाजपाला टोला लगावला. “तुम्हाला आठवतंय का की निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणामध्ये मला ईडीनं नोटीस पाठवली होती. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो. त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं नाही. आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली. मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला वेडी ठरवलं. त्यामुळे आज अजित पवारांच्या बद्दल किंवा इतर काहींच्या बाबतीत काही गोष्टी जर त्यांनी केल्या असतील, तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या संतापातून दिसून येईल. सत्तेचा गैरवापर राज्यकर्ते कसा करतात याबाबत निश्चित लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवारही म्हणतात, “पाहुणे…!”

एकीकडे शरद पवारांनी ‘सरकारी पाहुण्यां’चा उल्लेख केला असताना दुसरीकडे अजित पवारांनी देखील त्याच स्टाईलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे होते ते बोलेन. आता ते घरी आणि वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आहेत. ते जेव्हा जातील तेव्हा मला जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडेन आणि जे नियमानुसार आहे ते जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरण्यासारखे काही कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar mocks bjp narendra modi on incom tax raid on ajit pawar relatives pmw
First published on: 08-10-2021 at 13:11 IST