काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान भाजपाच्या ‘मिशन बारामती’ची घोषणा केली होती. त्यावरून राज्यात तुफान राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर उपहासात्मक शब्दांत टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील “बारामती महाराष्ट्रातच येते, भाजपाचं महाराष्ट्रासाठी मिशन आहे”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. हा सगळा कलगीतुरा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यावरून देखील त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

पक्षानं बारामतीवर लक्ष केंद्रीत केलं असून बारामतीची जागा जिंकून आणण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले होते. तसेच, यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी दौरे करणार असून बारामतीमध्ये देखील त्या येणार असल्याची माहिती दिली. यावरून विरोधकांनी टोलेबाजी केली असताना शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. राज्यात सध्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणावर देखील ते बोलले. “टीका करा, पण रोजच करू नका. एक दिवस-दोन दिवस ठीक आहे. किती दिवस? नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रीत करा”, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही कान टोचले. तसेच, हा प्रकल्प राज्याबाहेर जायला नको होता, तो गेला. पण आता दुसऱ्या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्लाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले, “आजकाल टीव्ही लावला की…”!

दरम्यान, यावेळी भाजपाच्या मिशन बारामतीसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता शरद पवारांनी उपहासात्मक शब्दांत टिप्पणी केली. “बारामतीत येणं हा त्यांचा अधिकार आहे. सगळ्या राजकीय पक्षांना जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते करावं. त्याबद्दल काही तक्रार नाही”, असं शरद पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांची भाषा लोकांना सहज समजेल”

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येत असल्याबाबत विचारताच ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. निर्मला सीतारमण येतील, त्यांच्या जनतेशी संवाद साधतील. बारामतीत येऊन, पुरंदरमध्ये येऊन, शिरूरमध्ये येऊन आपले विचार सांगतील. त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे विचार, त्यांची भाषा सहजपणे समजेल”, अशा सूचक शब्दांत शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली.

“इतरांना कशाला आमंत्रित करू?”

“मी बारामतीमध्ये येण्यासाठी नरेंद्र मोदी, प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केलं. त्या स्तरावरच्या लोकांना मी आमंत्रित करतो. आता बाकीच्यांना कशाला मी आमंत्रित करू?” असा खोचक सवालही शरद पवारांनी यावेळी विचारला.