लक्ष्मण राऊत

जालना जिल्ह्य़ातील भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संतोष रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्यात लढत होणार हे स्पष्ट आहे. दोघांच्याही उमेदवारीची त्यांच्या पक्षाकडून घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव तसेच प्रभाव क्षेत्र असलेल्या या मतदारसंघात २००९, २००४ आणि २००३ मधील पोटनिवडणूक, असा तीन वेळेस भाजपचा पराभव करून राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे विजयी झालेले आहेत.

चंद्रकांत दानवे जेव्हा-जेव्हा निवडून आले त्या त्या वेळेस त्यांची भाजपशी सरळ लढत झालेली आहे. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याचा परिणाम रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील मतांची विभागणी होण्यात झाला आणि चंद्रकांत दानवे पराभूत होण्यामागे अनेक कारणांपैकी हेही कारण ठरले.

चंद्रकांत दानवे यांचे वडील पुंडलिकराव मूळचे भाजपचे आणि त्या पक्षाकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले. १९९० मध्ये रावसाहेब दानवे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचा भोकरदन तसेच जिल्ह्य़ातील भाजपवरील प्रभाव वाढला. चंद्रकांत दानवे यांना १९९९ मध्ये भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली नाही. पुंडलिकराव दानवे यांची पक्षातील पुण्याई स्वतच्या मुलास उमेदवारी देण्याच्या कामी आली नाही. तेव्हापासून पुंडलिकराव आणि रावसाहेब यांच्यातील राजकीय अंतर वाढत गेले. त्याची परिणती २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुंडलिकरावांनी स्वतच्या मुलास राष्ट्रवादीकडून उभे करण्यात झाली. तेव्हापासून सलग तीन निवडणुका चंद्रकांत दानवेंनी जिंकल्या.

पुंडलिकराव आणि रावसाहेब हे दोन्हीही ज्येष्ठ नेते आता पुन्हा आपल्या मुलांसाठी प्रतिष्ठा पणाला लावतील. नव्वदी पार केलेले पुंडलिकराव आणि पासष्टी ओलांडलेले रावसाहेब हे दोन्ही दानवे आता मैदानात उतरतील.

नव्वदीतही प्रचार : पुंडलिकरावही आपल्या मुलाच्या प्रचारासाठी सज्ज आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जालना येथे जिल्ह्य़ातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्या वेळी नव्वदी उलटलेले पुंडलिकराव व्यासपीठावर उपस्थित होते. भाषण संपल्यावर पवारांनी मुद्दाम पुंडलिकरावांना बोलावून स्वतजवळ उभे केले आणि त्यांना उद्देशून ‘पुंडलिकराव आपण म्हतारे झालो आहोत का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर पुंडलिकरावांनीही ‘नाही-नाही’ असे सांगत प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले. तात्पर्य काय तर दोन्हीही ज्येष्ठ दानवेंना आता काळजी असणार आहे ती आपल्या मुलांच्या विजयाची!