अजित पवार यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी बारामतीत भाषण करताना बारामतीकरांना महत्त्वाचं आवाहन केलं होतं. आत्तापर्यंत तुम्ही शरद पवारांना मतदान केलंत, सुप्रिया सुळेंना मतदान केलंत आता सुनेला मतदान करा. पवार आडनाव दिसेल तिथे मत द्या असं अजित पवार म्हणाले होते. तसंच तुम्हाला भावनिक केलं जाईल, मात्र तसं न होता मत द्या असंही अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

मी तुम्हाला आवाहन करतो आहे, तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल. मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायाचा याचा विचार केला. सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा. असं अजित पवारांनी म्हटलं होतं. आता शरद पवारांनी जुना व्हिडीओ पोस्ट करत अजित पवारांना उत्तर दिलं आहे.

शरद पवारांची पोस्ट काय?

घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते… असा पुढारलेला विचार शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यापेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही ! असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जुन्या व्हिडीओत काय म्हणाले होते शरद पवार?

“एकच मुलगी का? याचं उत्तर मला द्यावं लागतं. मुलगा असता तर बरं झालं असतं. नाव चालवायला कुणीतरी हवं. बरं वाईट झाल्यावर मुलाने अग्नि दिल्यावरच मोक्ष मिळतो. मला त्याबाबत मला वाटतं की जिवंत नसताना अग्नि कोण देणार ? याची चिंता करायची की आपण जिवंत असताना नीटनेटकं वागणाऱ्यांची चिंता करायची.” असं शरद पवार या व्हिडीओत म्हणत आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, “मुख्य गोष्ट की मुलगा आणि मुलगी यांच्याकडे बघण्याचा भारतीय दृष्टीकोनच त्याज्य आहे तो टाकून दिला पाहिजे. आपण मुलीला मुलासारखं वाढवून, समान संधी देऊन तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला आहे. असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं. हाच व्हिडीओ शरद पवारांनी पोस्ट केला आहे.