श्रीरामपूर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय हा तुमच्या नातवासारखा आहे. त्याच्यासाठी लोकसभेची जागा सोडा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटून केले होते. अखेर पवार यांनी आज अकलूज (जि. सोलापूर) येथे नगरची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घोषित केला. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा सोडली नसल्याचा खुलासा केला. नगरच्या जागेच्या निर्णयावरच  राज्यातील पवार व विखे या दोन मातब्बर राजकीय घराण्यात सुरु असलेला संघर्ष एका वेगळ्या वगळणावर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेवर सात वेळा निवडून गेलेले माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी नेहमीच राजकीय संघर्ष राहिला. विखे हे राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात. पवारांची भूमिका ही नेहमीच विखे कु टुंबीयांच्या विरोधी राहिली. विखे यांना राजकीय शह देण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. स्वर्गीय विखे यांनीही पवारांवर नेहमीच नाव न घेता टीका केली होती. नगरच्या राजकारणात पवार यांनी विखे विरोधात भूमिका घेणारे माजी केंद्रीयमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे, स्वर्गीय पी.बी. कडू पाटील, भाऊ साहेब थोरात, मारुतराव घुले, बाबुराव तनपुरे, शंकरराव काळे, माजी मंत्री गोविंदराव आदिक, चंद्रभान घोगरे या दिवंगत नेत्यांना राजकीय साथ दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, दादा पाटील शेळके, माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना साथ केली. पवारांच्या विखे विरोधामुळे जिल्ह्यातील काँग्रेस—राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नेहमीच विखेंच्या विरोधात उभे ठाकले होते.

स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी राज्याच्या राजकारणात पवार यांच्या विरोधातील माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले, काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय संभाजी काकडे यांना राज्याच्या राजकारणात नेहमीच साथ केली. त्यांना समर्थन दिले. नगर जिल्ह्यात पवारांच्या राजकीय भरभराटीच्या काळात त्यांना खो घालण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांना छुपी साथ केली. दोघांमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष राहिला. पवार यांनी विखे कारखान्यामागे चौकशीचे शुक्लकाष्टही लावले होते. राजकीय संघर्षांबरोबरच दोघांमध्ये न्यायालयीन संघर्षही झाला. प्रसिद्ध विखे—गडाख निवडणूक खटल्यात पवार यांना विखे यांनी अडचणीत आणले होते. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरविण्याची नोटीस उच्च न्यायालयाने खटल्यात काढली होती. हा निकाल विरोधी गेला असता तर पवार यांचे राजकारण धोक्यात आले असते. पण सर्वोच्च न्यायालयातून पवार सुटले. पवार काँग्रेसमध्ये असताना व नंतर दोघांमध्येही राजकीय संघर्ष सुरुच राहिला. विखे यांच्या हयातीत तो संपला नाही. एवढेच नव्हे, तर माजी खासदार विखे यांच्या निधनानंतर पवार कु टुंबीय त्यांचे साधे सांत्वन करायलाही गेले नाही.

माजी खासदार बाळासाहेब विखे यांना पवार विरोधामुळे केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नव्हते. अखेर शिवसेनेत गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले. विखे यांचे राजकीय उत्तराधिकारी व विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याबद्दलही पवारांना नेहमीच आकस राहिला. विखे यांचे पक्षांतर्गत विरोधक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल पवारांना नेहमीच जिव्हाळा राहिला. नगरच्या सहकारात नेहमीच थोरात व पवार यांच्यात युती झाली. त्यालाही विखे—पवार संघर्षांची झालर होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुसऱ्या पिढीतही हा संघर्ष पुढे सुरुच राहिला. दोघांनीही एकमेकांना शह—काटशहाचे राजकारण केले. विखे यांचे प्रवरा परिसरातील विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, रावसाहेब म्हस्के, रविंद्र देवकर, एकनाथ घोगरे, स्वर्गीय शंकरनाना खर्डे, सध्या भाजपामध्ये असलेले राजेंद्र पिपाडा आदींना साथ केली. विखे यांच्याशी जुळवून घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वेळोवेळी समज दिली. जिल्हा बँक, जिल्हा परिषद तसेच अन्य संस्थांमध्ये विखे यांना दूर ठेवण्याचा अजित पवारांचा नेहमीच प्रयत्न असे. राधाकृष्ण विखे यांनी अजित पवारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. एवढेच नव्हे तर दोघांमध्ये छुपा संघर्ष सुरुच होता. विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद घालविण्यासाठी पवारांनी मोहीम आखली होती. विखे यांची राजकीय ताकद खच्ची करण्याचे काम पवारांनी नेहमीच केले. पवार विरोधक असल्याने दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे विखेंना नेहमी पाठबळ मिळम्त असे. एवढेच नव्हे, तर राज्यातील भाजपाचे नेतेही विखेंना साथ करत. दोन पिढय़ा सुरु असलेला पवार—विखे या राजकीय मातब्बर घराण्यातील सत्तासंघर्ष हा राज्याला पाहायला मिळाला.

शिर्डी लोकसभा मतदार संघ राखीव असल्याने लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणेतून इच्छुक होते. तीन वर्षांपासून त्यांनी तयारी सुरु केली. मात्र जागा वाटपात नगरचा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेलेला होता. डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक लढविणारच असे जाहीर केले होते. माजी आमदार पांडुरंग अभंग व आमदार राहुल जगताप या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विखे यांच्यासाठी नगरचा मतदार संघ सोडावा, असे वक्तव्य केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना समज दिली होती. विखे विरोधात नरेंद्र घुले, माजी कु लगुरु सर्जेराव निमसे व अनुराधा नागवडे या तिघांपैकी एकाला उमेदवारी देण्याचा घाट घालण्यात आला होता. नागवडे यांना काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत घेऊ न उमेदवारी देण्याचा निर्णयही झाला होता. नागवडे यांनी प्रचारही सुरु केला होता. विरोधी पक्षनेते विखे हे चिरंजीव डॉ. सुजयसह पवारांना भेटले. सुजय तुमच्या नातवासारखा आहे, असे भावनिक आवाहन विखे यांनी पवारांना केले. तरीदेखील पवार यांनी भूमिका बदललेली नव्हती. पवारांचे नातू रोहित पवार यांनी डॉ. सुजय विखे यांची भेट घेतली. तिसऱ्या पिढीने एकमेकांशी असलेला संघर्ष संपवावा, अशी भूमिका व्यक्त केली होती. विखे हे दिल्लीत काही दिवसांपासून ठाण मांडून होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. आता पवार यांनी अकलूज येथे काँग्रेसला जागा सोडणार असल्याचे जाहीर केले. तसे झाले तर मात्र दोन्ही मातब्बर कु टुंबीयांतील राजकीय संघर्ष तिसऱ्या पिढीत कमी होईल.

जय श्रीराम ऐवजी आता जय हो!

लोकसभेची निवडणूक लढविण्याचा सुजय यांचा अट्टाहास होता. पुत्रप्रेमापोटी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही अडचण झाली होती. निवडणुकीत कोणते चिन्ह घ्यायचे ते ऐनवेळी ठरवू, पण निवडणूक लढविणारच, असे सुजय सांगत होते. नुकताच विखे समर्थकांचा लोणी येथे मेळावा झाला. त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पक्ष सोडा, असे आवाहन केले. आठ दिवसापासून विखे भाजपामध्ये जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. पण आता नगरची जागा जर पवारांनी काँग्रेससाठी सोडली तर चित्र बदलेल. ‘जय श्रीराम’ नाही, तर ‘जय हो!’ अशा घोषणा दिल्या जातील.

खुलाशामुळे संभ्रम

नगरची जागा काँग्रेससाठी अद्याप सोडलेली नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अकलूज येथे जागेसंबंधी शरद पवारांनी उत्तर दिले, मात्र पवार यांच्या आवाजामुळे पत्रकारांना व्यवस्थित ऐकू आले नाही, असा खुलासा पाटील यांनी केला आहे. या खुलाशामुळे पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे. राष्ट्रवादीने जागा सोडली नाही तर तिसऱ्या पिढीतही संघर्ष सुरुच राहील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar ready to give ahmednagar lok sabha seat to congress
First published on: 02-03-2019 at 04:10 IST