शरद पवार हतबल वगैरे आहेत हे काही आम्हाला माहित नाही. शरद पवारांना पदावरून जाता येणार नाही. राज्यसभा तीन वर्षे आहे. राज्यसभेवर तीन वर्षे राहा आणि नंतर राज्यसभेसोबत एकत्र निर्णय घ्या. राजीनामा तेव्हा घ्या आज नाही. २०२४ चं युद्ध समोर आलं आहे. संपूर्ण देश शरद पवारांकडे अपेक्षेने बघतो आहे. सगळ्या देशाचे विरोधी पक्ष नेते शरद पवार यांनी एकत्र केले आहेत. अशात ते पद कसं काय सोडू शकतात असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सगळेजण शरद पवार यांचंच ऐकतात ही वस्तुस्थिती

नितीश कुमार शरद पवारांचं ऐकतात, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन सगळे तुमचंच ऐकू शकतात. वाय. एस. आरच्या मुलाला तुम्हीच आणू शकता. राजकारणामध्ये आपल्यापेक्षा देशाचा जास्त विचार करावा लागतो. २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर जर शरद पवारांनी हा निर्णय घेतला तर विरोधी पक्षच हतबल होईल. देशाच्या अनेक नेत्यांनी साहेबांशी संपर्क साधला. पी. सी. चाको येऊन शरद पवारांना भेटून आले. देशातल्या सगळ्या अध्यक्षांशी मी बोललो आहे त्यात मला सगळ्यांनी मला सांगितलं की शरद पवार असा राजीनामा देऊ शकत नाहीत. या गोष्टीचे दूरगामी परिणाम देशाच्या राजकारणावर होतील असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

शरद पवार हे देशाच्या राजकारणाचं केंद्र स्थान

मला आपचं माहित नाही मात्र कम्युनिस्ट पक्षाने शरद पवारांशी संपर्क साधला आहे. शरद पवार हे केंद्रस्थान आहेत. सगळे राजकीय विरोधी पक्ष ज्यांच्या घरात आरामात जातात आणि आपलं मत व्यक्त करतात हे घर फक्त शरद पवार यांचं आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, स्टॅलिन, तेजस्वी यादव सगळेच तिकडे जातात. विरोधी पक्षांसाठी ती आपुलकीची जागा आहे. असं सगळं असताना शरद पवार फक्त स्वतःचा विचार नाही करु शकत, माझं वय झालं आहे आणि मला आता निवृत्त व्हायचं आहे असं ते म्हणू शकत नाहीत असंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामुदायिक मताचा आदर करायला हवा

मला शरद पवार यांच्या भाषणातलं कायमच आठवतं ते म्हणजे सामुदायिक शक्तीचा सन्मान केला पाहिजे. पक्षातल्या ८० टक्के कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की साहेबांनी राजीनामा देऊ नये. मग लोकभावनेचा सन्मान करायला शिका हे आम्हाला शरद पवारांनी शिकवलं आहे. आता जनभावना अशी आहे की शरद पवारांनी राजीनामा देऊ नये त्याचा आदर शरद पवार यांनी केला पाहिजे असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.