आज २०२२ या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नव्यावर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलत असताना ते म्हणाले की, “सत्तेचा गैरवापर होतोय, हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे दिसून आले आहे. ज्या लोकांना आत टाकलं, त्यांच्याबद्दल काही आढळलं नाही, हे न्यायदेवतेने देखील सांगितले आहे. सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागचे सहा महिने – वर्षभरात झाले. याच्यामधून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा आहे, हे कोर्टाच्या माध्यमातून संबंध देशाच्या समोर आले आहे. सरकारने याच्यातून काहीतरी शिकावे, एवढीच अपेक्षा.”

राजकारणाच्या व्यतिरीक्त शेतीसाठी २०२२ हे वर्ष चांगले गेल्याचे पवार म्हटले. “संबंध वर्षाचा आढावा घेतला तर वर्ष २०२२ मध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सामान्य जनतेने प्रयत्न केले. आता आपल्या सर्वांसमोर २०२३ चे नवे प्रश्न उभे राहणार आहेत. नव्या वर्षाकडे संपूर्ण देश औत्सुक्याने पाहत आहे. आपल्याला माहितीच आहे देशातील ५६ ते ६० टक्के लोक शेतीच्या व्यवसायात आहेत. सरत्यावर्षात चांगले पर्जन्यमान झाले. शेती संपन्न झाली तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढते. बळीराजा यशस्वी झाला तर देशातील अन्य घटाकांचे देखील दिवस चांगले येतात. व्यापार आणि उद्योगांची भरभराट होते.”

हे ही वाचा >> New Year Celebration: “नवीन वर्ष साजरं करणं ‘हराम’, सैतानालाही….”; रझा अकादमीच्या अध्यक्षांचं विधान

मागचे वर्ष उद्योगधंद्यासाठी ठिक गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. आज सत्तेवर कुणीही असले तरी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राजकीय मतभेद विसरुन एकत्र राहावे लागेल. अर्थव्यवस्था नीट करावी लागेल. त्याला हातभार लावावा लागेल. त्याच्यातून देशाचे अर्थकारण सुधारण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. या आव्हानाला आपण सर्वजण सामोरे जाऊया, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा >> “आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर…”, शिंदे गटाचा अजित पवारांना इशारा; शंभूराज देसाई म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधारी पक्षाने राष्ट्राचा विचार करुन वागावे

पवार यांनी यावेळी संसदेचे अधिवेशन ज्याप्रकारे सुरु आहे, त्यावर नाराजी व्यक्त केली. “संसदेच्या अधिवेशनात काहीही होऊ शकत नाही. विरोधकांना बोलू द्यायचं नाही, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका आहे. सभागृहात गोंधळ घालायचा आणि त्यांना हव्या त्या बाबी मंजूर करुन घ्यायच्या. दुर्दैवाने हे चित्र किती दिवस चालू द्यायचे याचा विचार विरोधकांनाही करावा लागेल. जानेवारी महिन्यात नव्या अधिवेशनाची सुरुवात होईल, फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सत्ताधारी पक्षाने राष्ट्राचा विचार करत संसदेचा दर्जा राखण्याची भूमिका घेऊन पावले टाकली पाहीजेत. विरोधक म्हणून आम्ही सहकार्य करु.”