Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आलं आहे. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांना पहलगामबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी उत्तर दिलं. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? यावरही उत्तर दिलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हे विचारलं असता शरद पवार म्हणाले की दोन कुटुंबं एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज राजकारणावर काही भाष्य नको असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांंनी या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. तसंच पहलगामबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
पहलगामबाबत काय म्हणाले शरद पवार?
पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात धर्म, जात, पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाय योजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हीच भूमिका आमची आहे. पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे. कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे. कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणं हे उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसंच जगाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच काही मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती. त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलवणं हे उपयुक्त ठरेल असं म्हटलं आहे.