“देवानंद किंवा अमिताभ बच्चन नाही तर शरद पवारच आमचे हिरो होते. आमची पार्टीही राष्ट्रवादी नाही तर शरद पवारच होते. त्यामुळे मला पवारांबाबत काहीही बोलायचं नाही” असं वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील सभेत केलं. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र आज मी राष्ट्रवादीतच आहे उद्याचं उद्या पाहू असं म्हणून त्यांनी ही चर्चा कायम ठेवली आहे. फलटण या ठिकाणी त्यांनी समर्थकांचा मेळावा बोलावला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचं रामराजे नाईक निंबाळकर जाहीर करतील असाही अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही.

“माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र मला कोणीही अस्वस्थ करु शकत नाही. शरद पवार यांच्याबाबत काहीही बोलणार नाही कारण तेच आमचे हिरो होते.” असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. मेळाव्याच्या सुरुवातीलाच रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी हा पक्ष सोडायचा का? तुमच्या मनात कोणत्या पक्षात जायचं आहे? हे प्रश्न विचारले. मात्र मेळावा संपेपर्यंत काहीही जाहीर केलं नाही. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार की नाही हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

आज दुपारीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला शरद पवार यांना दुखवायचं नाही असं म्हटलं होतं. इतकंच नाही तर आज तरी मी राष्ट्रवादीत आहे उद्याचं उद्या पाहू असंही म्हटले होते. त्यानंतर ते मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता शिगेला लागली होती. मात्र मेळाव्यात त्यांनी शरद पवार यांनाच आपला हिरो म्हटलं. तसंच कोणताही निर्णय जाहीर केला नाही त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष्य लागलं आहे. विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकते. अशात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील दिग्गजांनी या पक्षांची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेनेत जाणं पसंत केलं आहे. उदयनराजे भोसले हेदेखील शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र आज तरी त्यांनी याबाबतचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.