काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा 23 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी परळी या ठिकाणी पार पडणार आहे. या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी परिवर्तन यात्रा काढून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ही जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या समारोपाची असली तरी या सभेत लोकसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. ही सभा राष्ट्रवादीची असली तरी या सभेला कॉंग्रेस पक्ष आणि समविचारी पक्षांनाही पाचारण करण्यात आले आहे.

नांदेड येथे काँग्रेस पक्षाने आघाडीची पहिली जाहीर सभा घेतली असून दुसरी सभा परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोकणातून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असं करत राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरोधात रान उठवले. जनतेमध्ये सरकारच्या फसव्या घोषणा, घोटाळे आणि आश्वासने याबाबत जागृती करण्याचे काम परिवर्तन संपर्क यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले. या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

राष्ट्रवादीने २०१७ पासून राज्यात हल्लाबोल आंदोलन सुरू करुन भाजप-सेनेच्याविरोधात रान पेटवले आहे. त्यानंतर अनेक आंदोलने करत राष्ट्रवादीने ‘परिवर्तन झालंच पाहिजे हे सरकार गेलंच पाहिजे’ ही टॅगलाईन वापरुन निर्धार परिवर्तन यात्रा काढली. भाजप- सेना सरकारच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळलेली असल्याने जनतेने राष्ट्रवादीच्या या आंदोलनामध्ये सहभागी होत प्रतिसाद दिला.

या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,खासदार सुप्रियाताई सुळे या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. सरकारच्या ध्येयधोरणावर कडाडून हल्ला केलाच शिवाय सरकारला सळो की पळो करून सोडल्याचेही चित्र पाहायला मिळाले.