कुठल्याही क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या सदैव पाठीशी उभे राहणे, देशातील राजकीय पक्षांमध्ये संवाद बंद झाल्याची स्थिती निर्माण होते तेव्हा स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यात संवाद घडवून आणणे, ही शरद पवार यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. तसेच ते एक दिलदार विरोधक आहेत. या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. अमरावती येथे शरद पवार यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांची गुणवैशिष्ट्ये प्रेक्षकांसमोर मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मोठे मुत्सदी नेते आहेत. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या हिताचा ते कायमच विचार करतात. त्यामुळे आपली ६० टक्के शक्ती ते देशहितासाठी खर्च करतात तर उर्वरित ४० टक्के शक्ती पक्षासाठी खर्च करतात. कृषिक्षेत्राचा दांडगा अभ्यास असल्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी केंद्रात कृषी खातं स्वतःहून मागवून घेतलं होतं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. याची आठवण यावेळी फडणवीस यांनी करुन दिली.

यंदा राज्य सरकारने आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केली. मात्र, याबाबत पवारांची स्पष्ट भूमिका फडणवीस यांनी उलगडून सांगितली. ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफीबाबत राजकीय फायद्याचा विचार न करता त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना अवास्तव मागण्या न करण्याचा सल्ला दिला. तसेच या निर्णयात सरकारला हवी ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. विदर्भ-मराठवाड्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा समृद्धी महामार्ग हा विकासाचा मार्ग असल्याने शेतकऱ्यांनी त्याला विरोध न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच या बदल्यात योग्य मोबदला मिळवून देण्याबाबत सरकारशी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या मनमिळावू वृत्तीमुळे शरद पवार सर्वमान्य नेते झाले आहेत. विरोधीपक्षात असतानाही महाराष्ट्राच्या हितासाठी एखादी गोष्टीची सूचना ते करतात. मला अनेकदा त्यांच्या सल्ल्यांचा फायदा झाला आहे, अशी प्रांजळ कबुलीही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, सत्काराला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी मी सदैव काम करीत राहणार आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफी हा सध्या राजकीय पटलावरील ज्वलंत विषय असताना, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars good opponent says chief minister fadanvis
First published on: 23-10-2017 at 17:25 IST