तत्कालीन भाजपा-शिवसेना सरकार असताना २०१४ ते २०१९ साला दरम्यान भरत्यांची घोषणा केली होती. मात्र, अनेक अडथळे आले, काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन, तीन वर्ष ताटकळत बसावं लागलं. आपल्या जीवनातील अखेरची भरती आहे, असं तरुणांनी समजू नये. तसेच, कृपया छोट्या गोष्टींसाठी न्यायालयात जात भरती रखडवू नका. त्याने तुमचेही आणि बाकीच्यांचे सुद्धा नुकसान होते, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते. “रोजगार मेळाव्यात २ हजार तरुणांची नियुक्ती करण्यात येत आहे. तरी, एका वर्षात ७५ हजार नोकऱ्यांच्या महामेळाव्याची ही सुरुवात आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : “ते प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले?,” एकनाथ शिदेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच मंचावरुन केलं भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांना सल्ला देत फडणवीस यांनी सांगितलं, “आपण सरकारी नोकरीत आला आहात. सरकारी नोकरी सेवा असून, संविधानाने आपल्या सर्वांवर टाकलेली जबाबदारी आहे. तुम्ही सेवेकरी म्हणून जनतेला सेवा देत आहात. त्यामुळे आपल्याकडून माझी अपेक्षा आहे, सेवेचा भाव कमी होणार नाही. सर्वसामान्य माणसाला तेवढच महत्व मिळेल, जेवढे एखाद्या श्रीमंताला आपल्याकडे मिळते. तसेच, देशाच्या विकासाला अडसर असलेल्या भ्रष्टाचारापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,” असेही फडणवीस यांनी सांगितलं.