शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केल्यानंतर तिकडे गुवाहाटीमधील हलचालींनाही वेग आलाय. शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने प्रथमच या राजकीय लढाईत प्रत्यक्षात उडी घेतल्यानंतर शिंदे यांनी काल रात्री बंडखोर आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. भाजपाच्या मागणीनुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांना येत्या तीन दिवसांत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश देण्याची शक्यता असून बंडखोर आमदारही आज दुपारपर्यंत मुंबईत परण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना या बहुमताच्या चाचणीच्या मुद्द्यावरुन न्यायालयामध्ये जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात असल्याने बंडखोर आमदार एवढ्यात परत येणार नाही असाही एक अंदाज बांधला जातोय.

नक्की वाचा >> “फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, शिवसेनेचा थेट इशारा; राष्ट्रवादीविरोधावरुन बंडखोरांवरही टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ‘‘शिवसेनेच्या ३९ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. याशिवाय काही अपक्षांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ४६ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे,’’ अशी मागणी भाजपाने केली आहे.

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

दरम्यान भाजपाच्या या मागणीनंतर तिकडे गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी रात्री तातडीची बैठक बोलावून या घडामोडींसंदर्भात सहकारी आमदारांसोबत चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट आज म्हणजेच २९ जून रोजी दुपारनंतर मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या पत्राची प्रत मिळाल्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार की नाही यावर हा निर्णय अवलंबून राहणार आहे. दरम्यान शिंदे गट मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे.

नक्की वाचा >> “एका बाजूला आपल्या पुत्राने…” मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आदित्य, राऊतांच्या वादग्रस्त विधानांवरुन शिंदेंचा सवाल

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे पत्र प्राप्त झाल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला तशी मुभा दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपात्र ठरविण्याच्या नोटिशींविरोधातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी विश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा आला होता.

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर निर्णय होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली होती. ही सुनावणी झाली तेव्हा विश्वासदर्शक ठरावाचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. असा आदेश दिला तर आमच्याकडे या, असे न्यायालयाने म्हटले होते. यामुळे राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यावर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय शिवसेनेपुढे उपलब्ध असेल. शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय होईपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडण्याची सक्ती करू नये, अशी शिवसेनेची भूमिका असेल.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना सर्वोच्च न्यायलयात जाणार की नाही यावर शिंदे आणि गटाचे मुंबईतील आगमन अवलंबून आहे. शिवसेनेनं सर्वोच्च न्यायलयात जाण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे आणि गट वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असेल. मात्र तसं झालं नाही आणि बहुमत चाचणी होणार असेल तर शिंदे आणि गटाला मुंबईमध्ये लगेच परत यावं लागेल.