VIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, "त्या खेकड्याला…" | Shinde faction MLA Sanjay Gaikwad criticize Sanjay Raut over attack threat | Loksatta

VIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन हल्ले करण्याची धमकी आल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या धमकीवरून संजय राऊतांवर सडकून टीका केली.

VIDEO: संजय राऊतांवर हल्ला करण्याची धमकी, शिंदे गटाचे आमदार म्हणाले, “त्या खेकड्याला…”
संजय गायकवाड व संजय राऊत (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन हल्ले करण्याची धमकी आल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या धमकीवरून संजय राऊतांवर सडकून टीका केली. “संजय राऊत प्रसिद्धीसाठी थापा मारत आहेत,” असा आरोप आमदार गायकवाडांनी केला. ते गुरुवारी (८ डिसेंबर) बुलडाण्यात त्यांच्या कार्यालयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत प्रसिद्धीसाठी जीवे मारण्याची धमकी आली अशी थाप मारत आहेत. त्या खेकड्याला कोण मारणार आहे.”

व्हिडीओ पाहा :

“लाटा आणि हवा येण्याचा काळ गेला”

गुजरात निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निकालावर काय परिणाम होईल? असा प्रश्न पत्रकारांनी संजय गायकवाडांना विचारला. ते म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला फार वेळ आहे आणि असा कोणत्याही राज्याचा दुसऱ्या राज्याच्या निवडणुकीवर परिणाम होत नाही. लाटा आणि हवा येण्याचा काळ गेला. लोक स्थानिक नेतृत्व आणि नेत्याच्या व्यक्तिगत कामावर मतदान करतात. अनेक निवडणुका अशाच होतात.”

“बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहचू शकले नाहीत”

“हे आम्हाला नावं ठेवतात आणि यातील कोणीच निवडून येणार नाही म्हणतात. बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहचू शकले नाहीत. आज काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो कोणताच पक्ष पोहचू शकला नाही. त्यामुळे जो उमेदवार निवडणुकीत उभा राहतो त्याची किमान ५० टक्के तरी पात्रता असते,” असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.

“मी कधी ३५ हजार, कधी ४० हजार मतांनी निवडून येतो”

संजय गायकवाड पुढे म्हणाले, “जसा मी दरवेळी कधी ३५ हजार, कधी ४० हजार मतांनी निवडून येतो. तशी प्रत्येक माणसाची क्षमता असते. त्याला पक्षाची जोड असते. काही लोकं पक्षाच्या विचाराने मतदान करतात, काही कामावर-विकासावर, कोणी संबंधानुसार, काही जातीपातीवर, कोणी नातीगोती यावर मतदान करतात.”

“आता देशात कोणाच्याही लाटा येत नाहीत”

“निवडणुकीत एका मुद्द्यावर कधीच मतदान होत नाही. आधी देशात हवा आली आणि लाट आली असं व्हायचं. मात्र, आता काही कोणाच्याच लाटा येत नाहीत. मोदींचं १० वर्षांचं काम दिसणार आहे. लोकं कामावर मतं देतील. मोदींसारखा विचार देशाला आधी भेटला नाही. काही लोक विचारालाही मतं देतात,” असं मत संजय गायकवाडांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी, यावर भाजपा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

मोदींचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम होईल का?

मोदींचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर परिणाम होईल का? या प्रश्नावर संजय गायकवाड म्हणाले, “काही नेत्यांच्या कामावर, विचारावर, पक्षावर मतं मिळतात. उद्या नरेंद्र मोदी आणि आमचे एकनाथ शिंदे नसतील, तर भाजपाचा मतदार भाजपाला सोडणार आहे नाही. काँग्रेसला मानणारा जो कोणी १०-२० टक्के मतदार आहे तो त्या पक्षाला सोडत नाही. लोकांना वर काय होतं याच्याशी घेणंदेणं नसतं. त्यांचा एक विचार पक्का असतो. मी या पक्षाचा, मला या पक्षाला मत द्यायचं हे त्यांचं ठरलेलं असतं आणि ते त्यालाच मत देतात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:10 IST
Next Story
“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान!