Maharashtra Political Crisis, Shinde vs Thackeray: केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बहाल केले. या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी सुनावणीपर्यंत शिवेसना पक्षाकडून व्हीप जारी केला जाणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले आहे. दोन आठवड्यानंतर या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल, असे निर्देश दिले. या सर्व प्रकरणावर आता शिंदे गटात असलेल्या निहार ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती येणार नाही
उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. “सर्वोच्च न्यायालयात समोरच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर युक्तिवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेतली आहे. पुढच्या तारखेपर्यंत कोणत्याही बाजूच्या आमदार-खासदारांना अपात्र करता येणार नाही. आम्हाला दोन आठवडे उत्तर दाखल करण्यास दिले आहेत. पण आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका वकील निहार ठाकरे यांनी मांडली.
शिवसेना हा पक्ष आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली
शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असेही निहार ठाकरे यावेळी ठामपणे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचे आम्ही स्वागत करतो निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, तशी स्थगिती दिलेली नाही. आता जेव्हा सुनावणी सुरु होईल, तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देवू,असेही ते म्हणाले.
हे वाचा >> “वहिनींनी कळत-नकळत…”, शिवसेना फुटण्याचे कारण सांगताना भरत गोगावले यांनी केला खळबळजनक आरोप
“आज आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी आश्वासन दिले आहे. बँक खाते, प्रॉपर्टी हे पक्षाचे होते. आता पक्ष शिंदे चालवत आहेत. ज्यांच्याकडे आता पक्षच उरला नाही, त्यांचा पक्षाच्या कोणत्याही वस्तूवर अधिकार उरला नाही. सर्वोच्च न्यायालयाने मात्र यावर कोणताही निर्णय दिलेला नाही. कारण हे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले गेले नव्हते.”, अशीही माहिती निहार ठाकरे यांनी दिली.