माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर रामदास कदम यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहे. आताही त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत. त्यांना मराठा व्यक्ती मोठा झालेला आवडत नाही. हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, असं विधान रामदास कदम यांनी केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दार उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही. उद्धव ठाकरे अडीच वर्षात तीन वेळा मंत्रालयात आले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली,” अशी कोपरखळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना मारली आहे.

“आदित्य ठाकरेंनी याचं भान…”

“आदित्य ठाकरे याचं वय आता ३१ वर्षे आहे, तेव्हाच आपलं राजकीय वय ५२ वर्षे आहे. आपलं वय काय, काय बोलतो, आपण ठाकरे कुटुंबातील आहोत, याचं भान आदित्य ठाकरेंनी ठेवायला हवे,” असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मातोश्रीवर गेलेल्या १०० खोक्यांचा हिशोब द्यावा लागेल”

शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून बंडखोर आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यालाही रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मातोश्रीवर गेलेल्या १०० खोक्यांचा हिशोब यांना द्यावाच लागेल. मातोश्रीवर कितीही मिठाईचे खोके गेले तरी त्यांना कधीही डायबिटीज होत नाही,” असेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.