अलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात पालकमंत्रीपदावरून रंगलेल्या नाट्याचा एक अंक महाराष्ट्रदिनीही लिहिला गेला. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे ध्वजवंदन करणार असल्यामुळे आधी नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदेंच्या स्थानिक आमदारांनी चक्क या सोहळ्याकडे पाठ फिरविली.

येथील पोलीस परेड मैदानावर महाराष्ट्र दिनाच्या मुख्य ध्वजवंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने ध्वजवंदनाचा मान तटकरेंना दिल्यामुळे आधी शिंदे गटाच्या आमदारांनी आदळआपट केली. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत तटकरे यांना ध्वजवंदन करण्यापासून रोखण्याचा इशारा दिला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सबुरीचा सल्ला देत चुकीचे पाऊल उचलू नका असे स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी या मुख्य सोहळ्याला दळवी यांच्यासह भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे या जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी दांडी मारली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

भाजप आमदारही गैरहजर

रायगड जिल्ह्यातील भाजपचे चार आमदारदेखील ध्वजवंदन सोहळ्यापासून दूर राहिले. प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी हे विधानसभेतील तीन आमदार तर विक्रांत पाटील हे विधान परिषदेचे आमदार मुख्य ध्वजवंदन सोहळ्यास हजर नव्हते.