राहाता: ग्रामीण भागातील सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे सांस्कृतिक भवन साईबाबा संस्थानच्या नावलौकिकात भर घालणारे आहे. या वास्तूमध्ये खरे कलाकार घडतील. या ठिकाणी घडलेले कलाकार भविष्य घडवून संस्थानचा गौरव वाढवतील, अशी अपेक्षा साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे यांनी व्यक्त केली.
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील साईबाबा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन न्या. अंजू शेंडे (सोनटक्के) यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, उपकार्यकारी अभियंता संजय जोरी आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले, की शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी विविध स्पर्धांतून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. या वेळी वास्तुविशारद डी. ओ. निकम, तसेच संस्थानच्या विभागप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. संगीत मार्गदर्शक सुधांशु लोकेगावकर, प्राणेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साई भजन आणि स्वागत गीत सादर केले. संस्थान कर्मचारी भरत विसपुते, अजिंक्य गायकवाड यांनी गीते सादर केली. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केले. प्राचार्य विकास शिवगजे यांनी आभार मानले. राजेंद्र कोहोकडे यांनी सूत्रसंचालन केले.
ग्रामीण भागातील सर्वात मोठे व अत्याधुनिक
शिर्डीमध्ये उभारण्यात आलेले हे सांस्कृतिक भवन ग्रामीण भागातील सर्वात मोठे व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्याच्या उभारणीसाठी सुमारे ५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. १०८४ आसन क्षमता आहे. सांस्कृतिक भवन संपूर्ण वातानुकुलीत आहे. ५० फूट लांब व ४० फूट रुंदीचे व्यासपीठ, आधुनिक ध्वनीयंत्रणा व दिव्यांची व्यवस्था आहे. ५ ग्रीन रूम, १२ अतिथी कक्ष, २ व्हीआयपी कक्ष तसेच तळमजल्यावर २५० चारचाकी वाहने उभ्या राहतील अशी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय १५० दुचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था स्वतंत्रपणे आहे. अंतर्गत सजावट लक्षवेधी आहे. शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या वतीने सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते, त्यासाठी हे सुसज्ज सांस्कृतिक भवन उपयुक्त ठरणार आहे.