वेध विधानसभेचा
प्रबोध देशपांडे, अकोला</strong>
लोकसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता वाशिम जिल्हय़ातील विधानसभेच्या सर्वच जागा युतीसाठी पोषक समजल्या जात आहेत. शिवसेनेसाठी कुठला मतदारसंघ सोडायचा हा तिढा युतीत आहे. मोदी लाटेतही रिसोडची जागा कायम राखणाऱ्या काँग्रेससह राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे अंतर्गत बंडाळी रोखण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे असेल. वंचित आघाडीच्या प्रभावावर मतदारसंघांचे समीकरण अवलंबून राहील.
वाशिम जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी वाशिम, कारंजा भाजपकडे, तर रिसोडवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांमध्ये युतीला मताधिक्य मिळाले. सर्वच मतदारसंघात युतीकडे इच्छुकांची गर्दी असून, उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून येते. मात्र, युतीत जागा वाटपाचा पेच आहे. युतीमध्ये परंपरागत शिवसेना लढत असलेल्या कारंजामध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला. आता भाजप कारंजा शिवसेनेसाठी सोडणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. पर्यायी मतदारसंघ म्हणून रिसोड व वाशिमचा विचार होऊ शकतो. मात्र, वाशिममध्येही भाजप आमदार, तर रिसोडमध्ये अनेक इच्छुकांची रीघ लागली आहे. युती धर्म पाळण्यासाठी भाजप एखाद्या विद्यमान आमदाराचा बळी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत पाच वर्षांत आयाराम पक्षात वरचढ झाल्याने भाजपतील निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे. महाआघाडीमध्ये रिसोड व वाशिम काँग्रेस, तर कारंजात राष्ट्रवादी लढेल. तिन्ही मतदारसंघांत सक्षम उमेदवार देण्याचा अॅड. आंबेडकरांचा प्रयत्न असेल.
वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा सर्वाधिक चर्चित मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये ऐनवेळी हातात कमळ घेतलेले राजेंद्र पाटणी मतविभाजनामुळे विजयी झाले. युतीत मतदारसंघ कुणाला सुटणार, याचा निर्णयच अधांतरी असल्याने त्यांना उमेदवारीसाठीच संघर्ष करावा लागेल. गेल्या वर्षी मतदारसंघात असमाधानकारक पाऊस होता. मात्र, राजेंद्र पाटणींनी हिवाळी अधिवेशनात जलयुक्त शिवारची भरघोस कामे झाल्याचे सांगून सरासरी पाऊस झाल्याने परिस्थिती चांगली असल्याचे वक्तव्य केले होते. दुष्काळाच्या यादीत कारंजा व मानोरा तालुके नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला. त्याकारणाने शेतकऱ्यांमध्ये पाटणींविषयी रोष आहे. मतदारसंघ बाहेरील म्हणूनही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर निघतो. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे मो.युसूफ पुंजाणी यांनी भारिप-बमसंच्या आपल्या पदांचा राजीनामा दिला. मध्यंतरी ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. शिवसेनेसाठी कारंजा सुटल्यास राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार प्रकाश डहाके यांचे नाव चर्चेत आहे. उमेदवारीच्या शब्दावरच त्यांनी हातात शिवबंध बांधले.
रिसोडचा गड कायम राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असेल. सुभाष झनक यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे सुपूत्र अमित झनक यांनी पोटनिवडणूक आणि मोदी लाटेतील २०१४ निवडणुकीतही रिसोडचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. विद्यमान आमदार असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांनी कुठलीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आपले वर्चस्व दाखवले. त्यांचे सुपुत्र अॅड. नकुल देशमुख लढण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अनंतराव देशमुखांची भूमिका महत्त्वाची ठरेल. युतीमध्ये परंपरागत भाजपकडे असलेल्या रिसोडमध्ये माजी आमदार विजय जाधव पुन्हा एकदा इच्छुक आहेत. गत तीन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. जनसंपर्क व सदस्य नोंदणी अभियानातून ते संपर्कात आहेत. आणखी एक-दोन नावे चर्चेत आहेत. वंचित आघाडीकडून दिलीप जाधव यांच्यासह इतर अनेक इच्छुक आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वाशिम मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्यासह अर्धा डझन इच्छुक आहेत. गतवेळी वाशिममध्ये शिवसेनेने तुल्यबळ लढत दिली होती. विद्यमान नगराध्यक्षही शिवसेनेचे आहेत. काँग्रेस व वंचित आघाडीकडूनही प्रत्येकी तीन ते चार नावे आहेत.
‘वंचित’चा प्रभाव कायम राहणार?
वाशिम जिल्ह्य़ात मतभेद समोर आल्यानंतर वंचित आघाडी व भारिप-बमसंची कार्यकारिणी नव्याने गठित केली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या न.प.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीचा प्रभाव राहून कारंजा, मंगरुळपीरमध्ये विजय, तर वाशिममध्ये निसटता पराभव झाला. लोकसभेत त्याचा परिणाम दिसून आला नाही. विधानसभेत प्रभाव कायम राखण्याचे आव्हान ‘वंचित’पुढे असेल.
महाआघाडी संपूर्ण क्षमतेने जिल्ह्य़ात निवडणूक लढेल. आघाडीमध्ये परंपरागत कारंजा राष्ट्रवादीकडे आहे. रिसोडमध्ये बहुतांश विकास कामे मार्गी लागली आहेत.
– अमित झनक, आमदार (काँग्रेस), रिसोड.
युतीमध्ये जिल्हय़ातील जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. रिसोडमध्ये मतदारांना नवा चेहरा अपेक्षित आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
– राजू पाटील राजे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपयुमो.
पक्षीय बलाबल
वाशिम भाजप
कारंजा भाजप
रिसोड काँग्रेस