औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत खुर्ची नाट्य पहायला मिळालं. खासदार इम्तियाज जलिल आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात खुर्ची नाट्य पहायला मिळालं. खैरे हे समोरच्या खुर्चीवर बसल्यानं जलिल यांना बसण्यासाठी करसत करावी लागली. दरम्यान, जलिल यांनी या खुर्ची नाट्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या बाजुच्या खुर्चीवर पर्यावरण आदित्य ठाकरे हे बसले होते. त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर इम्तियाज जलिल बसणार होते. परंचु त्या खुर्चीवर अचानक खैरे येऊन बसले. प्रोटोकॉलनुसार या जागा निश्चित करण्यात आल्या होत्या.

जिल्ह्याचे प्रश्न महत्त्वाचे : जलिल
“प्रोटोकॉलनुसार बसण्याची जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु माजी खासदार खैरे यांना अजुनही आपण खासदार असल्याचं वाटत आहे. त्यामुळे मला बाजुला बसावं लागलं. माझ्यासाठी खुर्ची महत्त्वाची नसून जिल्ह्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत,” अशी प्रतिक्रिया जलिल यांनी दिली. “आम्ही जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यांच्या नेत्यांनीच मला पुन्हा बोलावून शेजारी बसायला सांगितलं,” असंही त्यांनी नमूद केलं.

ती माझीच खुर्ची : खैरे
“मी या जिल्ह्याचा नेता आहे. गेली २० वर्षे मी खासदार होतो. मला जिल्ह्याची माहिती आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. जलिल नंतर आले, ती खुर्ची माझी होती,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली. “मला त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार आहे. मी जिल्ह्याचे प्रश्न सोडवतो. खुर्चीचा कोणताही वाद झाला नाही,” असं खैरे यांनी स्पष्ट केलं.