कोल्हापूर शिवसेना अंतर्गत वाद आज (शनिवार) दुसर्‍याही दिवशी चव्हाट्यावर आला. शिवसैनिकांच्या एका गटाने कार्यालयावरील राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर उतरवून ते फाडले. यावर क्षीरसागर यांनी ‘मी कमजोर नाही. एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा आहे,’ अशा भाषेत प्रति इशारा दिला आहे. यामुळे शिवसेनेतील वाद आणखी धुमसताना दिसत आहे.
शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र बाणा दाखवल्यानंतर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या यांचे समर्थन करण्यासाठी काल कोल्हापुरात मोर्चा निघाला, तेव्हा क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.

आज माजी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी कार्यालयावरील क्षीरसागर यांचे पोस्टर काढून फाडायला लावले. “ शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है” अशा घोषणा दिल्या. तसेच, “शिवसेनेशी गद्दारी केली. पक्षाच्या नावावर जोगवा मागून मंत्री पदाचा दर्जा मिळवला. शिवसेनेने सारेकाही वैभव देऊनही बकासुर राक्षस सारखी भूक असणाऱ्या राजेश क्षीरसागरची अहंकार जिरवू. शिवसेनेच्या नावावर गब्बर झालेल्या पिता-पुत्रांना धडा शिकवू.” , अशी टीकाही यावेळी इंगवले यांनी केली.

क्षीरसागर यांचा इशारा –

या घटनेनंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर संतप्त झाले. त्यांनी एका चित्रफितीद्वारे इंगवले यांना उद्देशून “ते गुंड असतील तर मी सुशिक्षित गुंड आहे. मी बाहेर पडेल तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. मी कमजोर नाही एकनाथ शिंदे यांचा पठ्ठा आहे.” असा इशारा दिला आहे.