Bharat Gogawale on Shivsena splitting: शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगत असताना माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. झी २४ तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोगावले यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. “आम्ही वारंवार उद्धव साहेबांकडे आमच्या अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो, पण त्यावेळी उद्धव साहेबांची थिअरी आम्हाला वेगळी वाटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करायचो, तेव्हा ते त्याकडे गांभीर्याने पाहत नसत. तसेच कोणताही निर्णय घेत नसत. मग हळूहळू आमच्या भावना तयार होत गेल्या की, यांना आमची गरज नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतंच ते मर्यादीत राहिले होते. तसेच उद्धव साहेबांच्या घरच्यांचे पक्ष संघटनेत हस्तक्षेप व्हायला लागले. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या, असा आरोप भरत गोगावले यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे असताना माँसाहेबांनी कधीच…

“उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेला बदल लोकांना देखील जाणवला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिलं. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणं तपासली पाहीजेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल ४० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो कार्यकर्ते आज त्यांच्यापासून बाजूला होत आहेत. तेही सत्ता असताना पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवं”, अशी सूचना भरत गोगावले यांनी केली.

उद्धव ठाकरेंना वारसदार केले तेव्हा बाळासाहेबांना..

बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना निश्चितच कार्याध्यक्ष करुन वारसदार ठरविले होते. पण ते त्यांचा वारसा कितपत चालवतील, याची कल्पना बाळासाहेबांना तेव्हा नव्हती, असाही आरोप गोगावले यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर नारायण राणे, गणेश नाईक आणि अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले, तेव्हा साहेबांनाही याची प्रचिती आली होती. त्यामुळे याचे आत्मचिंतन करणे गरजेचे होते, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना अपात्र करण्याची वेळ आली तर..

शिवसेनेने व्हिप बजावल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अपात्र ठरविण्याची वेळ आली तर काय कराल? असा प्रश्न विचारल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, आम्ही त्यासंदर्भात पक्षातंर्गत चर्चा करणार आहोत. पण उद्धव ठाकरे यांनी कोर्टकचेरी, निवडणूक आयोगाकडं जाणं असले प्रकार न करता समोरासमोर लढायला हवं. ते कोर्टात जातात, म्हणून आम्हालाही कोर्टात जावं लागतं. तुम्ही अडीच वर्ष काम केलं? असे बोलतात. त्याप्रमाणे आम्ही देखील कामातून उत्तर देत आहोत. आम्ही त्यांच्या तोंडाला तोंड देणार नाही, अशी भूमिका गोगावले यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.