Sanjay Shirsat Video Viral: शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली. या व्हिडीओमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या शेजारी एक पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. संजय राऊत यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख केलेला नसला तरी मंत्री संजय शिरसाट यांनी तो व्हिडीओ त्यांच्याच घरातील असल्याचे मान्य केले आहे. तसेच ती पैशांची बॅग आहे का? याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत यांनी व्हिडीओ समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (शिंदे) अनेक आमदार कोणत्या ना कोणत्या कारणांने चर्चेत आहेत. अधिवेशनापूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या घरातील पूजाविधी करण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी केलेला दिल्ली दौरा हा मुख्यमंत्रीपदासाठी होता, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेवरही संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत हे भुंकण्याचे काम करत आहेत. त्यांची विधाने दखल घेण्यासारखी नाहीत. ते सकाळ -संध्याकाळ केवळ एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत असल्याचे शिरसाट म्हणाले.
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला?
दरम्यान विधीमंडळात पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट यांनी सदर व्हिडीओ त्यांच्या घरातीलच असल्याचे स्पष्ट केले. “मी दौऱ्यावरून आल्यानंतर माझ्या बेडरूममध्ये बनियनवर बसलो आहे. बाजूला माझा लाडका कुत्राही फिरत आहे. दौऱ्यावरून आल्यामुळे माझी बॅग बाजूला ठेवून बेडवर बसलो आहे”, असे ते म्हणाले.
“अरे मुर्खांनो, माझ्याकडे पैशांनी भरलेली एवढी मोठी बॅग असेल तर मी ती कपाटात नाही का ठेवणार? नोटांची बॅग असती तर ती मी कपाटात ठोसली असती. पण कपड्याच्या बॅगेतही यांना पैसे दिसत आहेत. एकनाथ शिंदे एकदा हेलिकॉप्टरमधून उतरले असताना त्यांच्या बॉडिगार्डच्या हातातील बॅगाही नोटांनी भरलेल्या होत्या. असा आरोप केला गेला होता”, असे स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, “व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या बॅगेत कपडे आहेत. मात्र ते पैसे असल्याचे सांगितले जात आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक असे व्हिडीओ व्हायरल करत आहे. मात्र अशी बदनामी केली तरी त्याचा आमच्या कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.”