शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. या राजकीय गदारोळावर बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपाने एकनाथ शिंदेंना घातली आहे का? असा प्रश्न आंबेडकरांनी विचारला आहे. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. जवळजवळ ४३ आमदारांनी बंडखोरी करत शिंदेंना समर्थन दिल्यामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. गुप्तवार्ता विभागाने दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारला याबाबत इशारा दिला होता. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करावी लागत होती आणि ती आम्हाला मान्य नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” अशी भुमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली होती.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या गटासमोर भाजपाची अट? प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ ट्विटने खळबळ

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार
‘कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मला पाठिंबा देत आहेत. पण, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेन तर त्यांनी समोर येऊन सांगाव़े मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. मी पद सोडल्यानंतर शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे’’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना आमदारांना भावनिक साद घालत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला. मी शिवसेना पक्षप्रमुखपदही सांभाळायला अपात्र आहे, असे शिवसैनिकांना वाटत असेल तर तेही सोडेन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदेंच्या बंडात भाजपाची भुमिका नाही
तर एकनाथ शिंदे यांच्या बंडात भाजपाची भूमिका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. “एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याने आणि उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यास शिवसेनेचा पाठिंबा असल्याने हे घडले. एकनाथ शिंदे यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे श्रेय आम्ही (भाजपा) घेऊ शकतो. सत्ता, पद किंवा पैसा हे नेहमीच काम करत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते प्रतिष्ठा आणि सन्मान शोधतात, जो देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच दिला आहे,” असे भाजपा नेत्याने म्हटले आहे.