शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करतानाच हिंमत असेल तर पुढील विधानसभा येथून लढवून दाखवावी. डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही, असं थेट आव्हान दिलं आहे.

“नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला,” असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. “सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलंय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं,” असंही राऊत म्हणालेत. दिल्लीकरांना चांगलं वाटलं पाहिजे, मोदींना, अमित शाहांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणे नको त्या शब्दात टीका करतात असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.

“सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही. आजच नाही तर भविष्यातही कधी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही,” अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका जाहीर कार्यक्रमात नारायण राणेंवर केली आहे.

कोकणामध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत हा संघर्ष मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगीही दोन्ही बाजूच्या नेत्यांची टोलवाटोलवी पहायला मिळाली होती.