कराडमधील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, नागरिकांसाठी राहू देत निदान श्री गणेशाच्या आगमनासाठी तरी रस्ते दुरुस्ती करा, अशी मागणी करत शिवसेना आक्रमक झाली असून, संतप्त शिवसैनिकांनी शहरातील रस्ते तत्काळ दुरुस्ती न झाल्यास येथील नगरपालिकेसमोर बॅन्ड बाजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची पावसाळय़ात संपूर्ण वाताहात झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डय़ांचे जाळे पसरले असून, केवळ मुरूमपट्टी करून रस्ते दुरुस्तीचे काम झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, आजही शहरातील रस्त्यांची दुरवस्था वाढत आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गणेश मंडळांनी तयारी सुरू केली असून, निदान गणेश आगमनापूर्वी तरी रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पालिककडे करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे. कराड तालुका शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना नुकतेच रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आले.
या पत्रात म्हटले आहे, की शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसह अनेक विकासकामे रेंगाळली आहेत. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी कळवून किंवा आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठय़ा गणेशमूर्तीची शहरातून मिरवणूक काढली जाते. याचा विचार करून प्रत्येक रस्त्याची दुरुस्ती करावी याबाबतही पालिकेला निवेदन देण्यात आले होते. मात्र, सध्याची अवस्था पाहता मुरुमाच्या नावाखाली मोठमोठे दगड खड्डय़ांमध्ये टाकले असून, ते रस्त्याच्या वर येऊन वाहनांना जोराचा दणका बसत आहे. मुरूम टाकताना योग्य ती काळजी न घेतल्याने पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. उत्सव काळात दुरवस्था झालेल्या रस्त्याचा त्रास होण्याची शक्यता असून, याचा विचार करून नगरपालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. काम हाती न घेतल्यास पालिकेसमोर बॅण्ड बाजा वाजवून शंखध्वनी करण्यात येईल, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. शहरात पाणी योजनेचे काम रखडले असून, त्यामुळेच रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योजनेचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.