मी जेव्हा बंड केलं तेव्हा २० आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. त्यांनी सांगितलं की यातून मार्ग काढा. राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले? ज्यांना जायचं आहे त्यांनी जा मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. दरवाजे उघडेच ठेवा. कारण सगळे जातील शेवटी तुम्हीच राहाल. हम दो हमारे दो. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच राहिल. मी हे बोलतोय कारण आम्ही हे सगळं भोगलं आहे. असं म्हणत आज खेडच्या मैदानात उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. स्वार्थ जेव्हा माणसाच्या डोक्यात जातो, सत्तेची हवा डोक्यात जाते तेव्हा त्याला काहीच सुचत नाही. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे
कार्यकर्ता मोठा होतो तेव्हाच पक्ष मोठा होतो
जेव्हा कार्यकर्ता मोठा होतो तेव्हाच पक्ष मोठा होतो. मात्र कार्यकर्ता मोठा होऊ लागला की तुम्हाला (उद्धव ठाकरे) पोटदुखी होऊ लागते. संकुचित विचारांनी पक्ष वाढत नसतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांच्या भाषणाला टाळ्या पडतात, गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून तुम्ही त्यांची भाषणं बंद केलीत. संकुचितपणाचा कळस आहे.
उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवला. निवडणूक आयोगानेही याच न्यायाने आम्हाला चिन्ह आणि पक्ष दिला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे.आज आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमधल्या सभेत म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं.
बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारस म्हणून आपण शिवसेना पुढे नेत आहोत आणि वाढवत आहोत. शिवसेनेला डाग लावू द्यायचा नाही. मी यापूर्वीही सांगितलं आहे हजारवेळा सांगेन गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी २०१९ ला झाली. हिंदुत्वाचं राजकारण केलं ही चूक झाली हे उद्धवजींनी विधानसभेत सांगितलं. बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या विचारांना तुम्ही चुकीचं ठरवलं कशासाठी तर सत्तेसाठी? यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं? हिंदुत्वाशी गद्दारी आम्ही नाही तर तुम्ही केली.
राहुल गांधी सावरकर यांच्यावर बोलतात तुम्ही गप्प का?
राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात त्याच्यावर आपण मूग गिळून गप्प बसता. तुमच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ का येते? असाही सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. तसंच हे कसलं तुमचं हिंदुत्व आहे? खोके-खोके, गद्दार-गद्दार म्हणून तुम्ही तुमचं पाप झाकत आहात. बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे आम्हाला मान्य आहे सगळ्या जगाला मान्य आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत होतं. तुम्ही त्यांना वडील वडील म्हणून छोटं करू नका, संकुचित करू नका असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं
देशातलं ३७० कलम हटवणं आणि राम मंदिर उभं राहणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केलं. आम्ही ५० लोकांनी जो निर्णय घेतला यांच्यासोबत घेतला तो यासाठीच घेतला. या राज्यात किंवा राज्याच्या बाहेर एकनाथ शिंदे जिथे जातो तिथे लोक आशीर्वाद द्यायला लोक उभे असतात. आम्ही राज्याच्या हिताची भूमिका घेतली. त्यामुळेच खेडचं हे मैदान तुडुंब भरून वाहतं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.