काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातनंतर कर्नाटकमध्येही भाजपाची झोप उडवली असून यामुळे भाजपाच्या पोटात ‘मांसाहारी’ गोळा आला आहे, अशा शेलक्या शब्दात गुरुवारी शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे कर्नाटकमधील दौरे वाढले आहेत. कर्नाटकमध्येही राहुल गांधी यांनी मंदिराला भेट देण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या मंदिरभेटीवरुन भाजपने टीका केली होती. यावर ‘सामना’मधील अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी मांसाहर करुन दर्शन घेतल्याचा आरोप कर्नाटकमधील भाजपा नेते येडियुरप्पा यांनी केला. काँग्रेसनेही त्या आरोपांचे खंडन केले. पण निवडणूक प्रचारात असे मुद्दे येणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण असून राहुलच्या ताटात काय होते हे त्यांना माहित पण यामुळे भाजपच्या पोटात मात्र ‘मांसाहारी’ गोळा आल्याची टीका त्यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी सौम्य हिंदुत्ववादी भूमिका घेत भाजपाला कोंडीत पकडले आहे. राहुल गांधींनी हिंदुत्वाचा स्वीकार केला तर आपले कसे व्हायचे ही चिंता भाजपाला वाटत असावी आणि म्हणूनच त्यांच्याकडून राहुल गांधी यांच्यावर टीका होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
कोणीही कोणाच्या ताटात डोकावू नये. प्रत्येक मंदिरांच्या काही रूढी, परंपरा असतात. महाराष्ट्रात काही देवतांना मांसाहारी नैवेद्याची प्रथा असून देव ना श्रीखंड, तूप, पुरणाची पोळी मागतो ना कोंबडे- बकरे मागतो, असे अग्रलेखात म्हटले आहे. इंदिराजी शाकाहारी होत्या की मांसाहारी या वादात पडण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, अशी आठवण अग्रलेखातून करुन देण्यात आली. शाकाहार व धर्मप्रेमी येडियुरप्पांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सीमा भागातील मराठी भाषिकांचे रक्त सांडले, डोकी फोडली. हा हिंसाचार व दडपशाही म्हणजे मांसाहारच होता, अशी टीका शिवसेनेने केली आहे.