देशातील सामाजिक, धार्मिक एकोपा जवळजवळ संपला आहे. मुसलमान आणि हिंदूंत वर्गकलह घडावा, न संपणारे अराजक, नागरी युद्ध चालत राहावे अशाप्रकारचे कारस्थान सुरू आहे. त्यास खतपाणी घालणारे उद्योग ‘राजकीय प्रयोगशाळेत’ चालले आहेत. ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्दच नष्ट करणारे हे प्रयोग विद्रोहाच्या ठिणग्या निर्माण करणार असतील तर भविष्य आजच संपले असे मानायला हरकत नाही, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. देश तोडण्याची भाषा गेल्या पाचेक वर्षांतच का वाढीस लागली व ही भाषा करणार्‍यात शिकल्या-सवरलेल्या तरुणांचाच का भरणा आहे? हा संशोधनाचा विषय आहे, असे म्हणत शिवसेनेने सरकारवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे व शर्जीलच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रचारासाठी आयतेच कोलीत मिळाले आहे. शर्जीलचे वक्तव्य हे फुटीरतावादी व देशद्रोहीच आहे. दिल्लीत कोणाचेही सरकार असते तरी त्यांना शर्जीलला बेडय़ा ठोकाव्याच लागल्या असत्या. त्यामुळे शर्जीलला अटक करून उधळलेल्या हत्तीस अटक केली या भ्रमातून भगतगणांनी बाहेर पडले पाहिजे. देशात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायदा आपले काम करीत असतो. उलट शर्जीलवर तातडीने कारवाई झाली नसती तरच कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
देश तोडण्याची भाषा गेल्या पाचेक वर्षांतच का वाढीस लागली व ही भाषा करणार्‍यात शिकल्या-सवरलेल्या तरुणांचाच का भरणा आहे? हा संशोधनाचा विषय आहे. शर्जील हा ‘जेएनयू’मध्ये ‘पीएचडी’ करीत आहे व आय.आय.टी. मुंबईचा माजी विद्यार्थी आहे. अशा तरुणांच्या डोक्यात हे विष कोण भिनवत आहे, यावरही प्रकाश टाकायला हवा. प्रश्न एका शर्जील किंवा दुसर्‍या कन्हैया कुमारचा नाही. फुटीरतेची विद्रोही ठिणगी टाकून देशातील तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्रातील ‘एल्गार’प्रकरणी अटक केलेले सगळेच जण समाजातील नामवंत, बुद्धिवंत, विचारवंत आहेत व त्यांच्यावरही शर्जीलप्रमाणेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

देशातील सामाजिक, धार्मिक एकोपा जवळजवळ संपला आहे. मुसलमान आणि हिंदूंत वर्गकलह घडावा, इराक, अफगाणिस्तानप्रमाणे न संपणारे अराजक, नागरी युद्ध चालत राहावे अशाप्रकारचे कारस्थान सुरू आहे. त्यास खतपाणी घालणारे उद्योग ‘राजकीय प्रयोगशाळेत’ चालले आहेत. ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्दच नष्ट करणारे हे प्रयोग विद्रोहाच्या ठिणग्या निर्माण करणार असतील तर भविष्य आजच संपले असे मानायला हरकत नाही. शहरी नक्षलवाद आहेच. त्याचबरोबर उच्चभ्रू, उच्च शिक्षितांचा दहशतवाद वाढावा यासाठी राजकारणी विष कालवत असतील तर दुसरे काय होणार! एका शर्जीलला आज पकडले. दुसरा शर्जील निर्माण होणार नाही हीदेखील जबाबदारी सरकारची आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena saamna editorial criticizes central government sharjeel arrest kanhaiya kumar jud
First published on: 30-01-2020 at 08:03 IST