महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू होती. मात्र, त्यानंतर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. तसेच काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यानंतर विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता काँग्रेसने स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी यावरून आता थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय विभुते यांनी काय म्हटलं?

“लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी विशाल पाटील यांना देखील बोलण्यात आलं होतं. सांगलीमध्ये काँग्रेसने निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून गद्दारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला मदत करण्याची भूमिका घेतली. परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसही विशाल पाटील यांच्यासोबत गेली. काँग्रेसच स्नेहभोजन म्हणजे अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे”, अशी टीका संजय विभुते यांनी केली.

हेही वाचा : “तुमचे सागर बंगल्यावरील बॉस झोपले होते का?”; प्रशांत जगताप यांचं राम सातपुतेंच्या टीक…

संजय विभुते पुढे म्हणाले, “काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे”, असा इशारा संजय विभुते यांनी दिला.

“उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”, असा थेट इशारा ठाकरे गटाचे सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला.

ठाकरे गटाने का घेतली आक्रमक भूमिका

सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीनं स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनाला आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, या स्नेहभोजनाला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनीही हजेरी लावली. त्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला. तसेच सांगलीत महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील यांच्यावर कारवाई कण्याची मागणी केली आहे.