पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला होता. तसेच ही घटना अतिशय गंभीर असून कुणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य करत गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्न करत हल्लाबोल केला. या अपघात प्रकरणाची दखल घेत पुणे महापालिकेने कोरेगाव पार्क आणि मुंढवा येथील पबवर कारवाई केली. आता या पोर्श कार अपघात प्रकरणावरून भाजपाचे आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू झालं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका करत गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा सवाल केला होता. त्यावर आमदार राम सातपुते यांनी एक्स या सोशल माध्यमावर पुणे महापालिकेने कोरेगाव पार्क आणि मुंढवा येथील पबवर कारवाई केलेला व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, ‘याला गृहखातं सांभाळणं म्हणतात. अनिल देशमुख तुम्ही जर गृहमंत्री असतात तर पहिल्यांदा तुमच्या लाडक्या वाझेला वसुलीला पाठवलं असतं, या पब मालकांकडे’, अशी खोचक टीका राम सातपुते यांनी केली. त्या टीकेला शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : पुणे अपघातातील राजकीय वादात वसंत मोरेंची एन्ट्री; स्थानिक पुढाऱ्यांना इशारा देत म्हणाले, “हिंसक आंदोलन झालं तर…”

प्रशांत जगताप यांनी काय म्हटलं?

“रामभाऊ बीडवाले…हे अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सागर बंगल्यावरील बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् १०० नगरसेवक झोपले होते का? की दोन निष्पाप बळी जाण्याची वाट बघत होते?अनधिकृत पब बंद करणं हे काय पबजी खेळण्यासारखं आहे का?”, अशी खोचक टीका करत प्रशांत जगताप यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकरण काय?

पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या अपघातातील पोर्शे कार आणि त्या कारचा चालक हा अल्पवयीन आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला जामीन मंजुर झाला होता. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायीकाचा मुलगा ही अलिशान कार चालवत होता. दरम्यान, यानंतर या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. तसेच त्या मुलाच्या वडीलांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या अपघात प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.