Uddhav Thackeray on India-Pakistan Match: यूएईमधील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (१४ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्यावरून आता शिवसेनेने (ठाकरे) आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्र सोडले. पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबाबतच्या भाजपाच्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी ‘भाजपाने लायकीत राहावे’, असे म्हटले.

भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होऊ नये, यासाठी शिवसेनेकडून (ठाकरे) सातत्याने टीका होत आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते. मग यात क्रिकेट कुठून आले? याचा अर्थ पाकिस्तानबरोबरचे युद्ध आपण थांबवले आहे का? यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय उत्तर देणार? अशा प्रश्नांची सरबत्ती आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केली.

भाजपाने लायकीत राहावे

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला मातोश्रीवर प्रवेश दिला गेला होता, अशी टीका भाजपाकडून करण्यात येत आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाचे नेते बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेत आहेत का? भाजपाची एवढी लायकी आहे का? त्यांनी लायकीत राहावे. मी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने या शब्दाचा वापर करत आहे. ज्यांना ज्यांना बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका आहे, त्यांनी लायकीत राहावे. बाळासाहेब कुणाच्या घरी गेले नव्हते. तर जावेद मियाँदाद स्वतः इथे आला होता आणि बाळासाहेबांनी त्याच्या तोंडावर सामना होणार नाही, हे सुनावले होते.”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “जगभरात खासदारांचे शिष्टमंडळ पाठवून जे साध्य झाले नाही, ते एका सामन्यावर बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवून देऊ शकलो असतो की, दहशतवादाच्या विरोधात आम्ही आहोत. पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन देणारा देश आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान अतिरेकी कारवाया थांबवत नाही. तोपर्यंत आम्ही पाणीच काय तर कोणतेही संबंध ठेवणार नाही. हीच भूमिका शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती.”