ऐतिहासिक चित्र व वस्तुसंग्राहकांच्या दुनियेत काही दिवसांपासून एका ‘दुर्मीळ’ चित्राचा बोलबाला आहे. हे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ चित्र. ते डच चित्रकाराचे असल्याचे सांगितले जाते. त्याच्या कृष्णधवल प्रती दुर्मीळ म्हणून विकल्या जात आहेत. संग्राहकसुद्धा ते श्रद्धेने स्वत:कडे बाळगत आहेत.. मात्र वस्तुस्थिती अशी की, हे चित्र दुर्मीळ नाही किंवा डच चित्रकाराचेही नाही. ते प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी काढले असून, ते मुंबईत वांद्रे येथील म्हाडाच्या कार्यालयात लावले आहे.
सिंहासनावर बसलेल्या शिवरायांचे हे अतिशय आकर्षक चित्र आहे. त्यातील त्यांची बैठक व मुद्रा विशेष लक्ष वेधून घेते. या चित्राच्या कृष्णधवल रंगातील प्रती सध्या प्राचीन म्हणून विकल्या जात आहेत. त्याचे सांगितले जाणारे जुनेपण आणि डच चित्रकाराने काढलेले असल्याची दिली जाणारी माहिती यामुळे ते अनेकांच्या संग्रहात आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमावेळी या चित्राच्या प्रती अशीच माहिती सांगून विकल्या गेल्या. या कार्यक्रमात चित्रकार कामत यांच्या एका शिष्याने हे चित्र पाहिले आणि कामत यांचे असल्याचे ओळखले. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एका मराठी वाहिनीवर दाखवण्यात आले होते. ते पाहून कामत यांना आश्चर्याचा धक्काच बसला. याबाबत कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘मी काढलेले हे शिवाजी महाराजांचे पहिलेच चित्र आहे. ते म्हाडाच्या वांद्रे येथील कार्यालयात आहे. त्याचे अनावरण बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोक अशा प्रकारे इतिहासाशी खेळतात. त्याचा राग येतो. या ढोंगीपणाला आळा बसायला पाहिजे. लोकांनी शिवरायांचे चित्र जरूर संग्रही ठेवावे, मात्र त्यामागचा खरा इतिहासही पाहावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा चांगला कलाकार हे सहज ओळखू शकतो. एखादा कलाकार जिवंत असताना त्याच्या चित्राची दुसऱ्याच्या नावावर विक्री होणे ही शुद्ध फसवणूकच आहे.
– वासुदेव कामत, प्रसिद्ध चित्रकार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivajis rare picture drawn by famous painter vasudev kamat
First published on: 02-07-2014 at 03:40 IST