रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीवरील शिल्पाची दुरुस्ती रखडली आहे. शिल्पांच्या दुरुस्ती तथा रंगकामासाठी शिल्पकार मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. पर्यायाने दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेला पाच लाखांचा निधी वापराविना पडून आहे.
प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना अलिबाग येथे जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीला शिवतीर्थ असे नाव देण्यात आले. इमारतीचे वेगळेपण लक्षात यावे यासाठी इमारतीच्या बाह्य़भागावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी शिल्पे साकारण्यात आली,  तर इमारतीच्या आंतरभागातल्या भिंतींवर स्वातंत्र्यवीरांची सुंदर शिल्पे साकारण्यात आली. कल्याण येथील प्रसिद्ध शिल्पकार एल. जाधवराव यांनी ही देखणी शिल्पे साकारली.    
इमारतीवरील ही शिल्पे पाहण्यासाठी त्या वेळी मोठी गर्दी होत असे. राज्यातील जिल्हा परिषद इमारतींमधील आगळीवेगळी वास्तू म्हणून या इमारतीकडे पाहिले जात असे. मात्र काळ सरत गेला तशी इमारतीवरील शिल्पांची वाताहत होत गेली. ऊन, वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे इमारतीतील शिल्पे खराब झाली. इमारतीचे देखणे रूप नाहीसे होत गेले.
गेल्या दोन वर्षांत इमारतीच्या बाह्य़भागाचे तथा आंतरभागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. इमारतीच्या दुरुस्तीकामावर लाखो रुपये खर्ची पाडण्यात आले. यामुळे शिवतीर्थाची इमारत दुरुस्त झाली, मात्र इमारतीवरील शिल्पे तशीच राहिली. ही खरी खेदाची गोष्ट आहे. या शिल्पांच्या दुरुस्तीकामासाठी जिल्हा परिषदेने तब्बल पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात तशी तरतूदही करण्यात आली आहे.
मात्र शिल्पांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा शिल्पकार मात्र अद्याप मिळालेला नाही. इमारतीच्या बाह्य़भागात असलेल्या शिल्पांच्या दुरुस्तीचे काम हे मोठय़ा जिकिरीचे काम आहे, कारण उंचावर चढून अथवा झुल्याच्या साह्य़ाने लटकून या शिल्पांची दुरुस्ती आणि रंगकाम करावे लागणार आहे. हे काम करण्यासाठी शिल्पकार पुढे येत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले.
इमारतीची शिल्पे ही रायगड जिल्हा परिषदेची ओळख आहे. त्यामुळे या शिल्पांची दुरुस्ती योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती आणि रंगकाम करणारा शिल्पकार भेटणे गरजेचे आहे. पावसामुळे या कामाला उशीर झाला असला तरी लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माळे यांनी सांगितले.
शिल्पांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू केले जाईल. या दुरुस्तीकामासाठी अजूनही निधी लागला तर तो उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे यांनी दिली आहे.