राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहासोबतच बाहेर पायऱ्यांवर देखील खडाजंगी पाहायला मिळत आहे. घोषणाबाजीच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप आणि कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असताना आज सत्ताधारी पक्षातील शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’ अशा आशयाचे बॅनर्स गळ्यात घालून शिंदे गटाच्या आमदारांनी पायऱ्यांवर उभं राहात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावरून आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.

“त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे”

बुधवारी विधान भवनाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळावरून अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. “त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे. लोकांच्या सगळं लक्षात आलं आहे. अनेक व्हिडीओ क्लिप आहेत की ज्यात ते म्हणत आहेत की आम्हाला अमुक पैसे मिळाले वगैरे. त्यामुळे अब्रू केव्हाच गेली. जो बूंद से गई, हौद से नही आएगी. कितीही पायऱ्यांवर उभे राहा. ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार”, असं सावंत म्हणाले.

“आदित्य ठाकरे उद्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व”

दरम्यान, आदित्य ठाकरे हे उद्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, असं अरविंद सावंत म्हणाले. “त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात. त्यांना कळून चुकलंय की हे उद्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. देशाचंही नेतृत्व कदाचित ते होतील. मग त्यांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. एक दूरदृष्टी असणारा तरुण मुलगा एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबईचं नेतृत्व करत होता. दावोसमध्ये ज्याची मुलाखत घेण्यासाठी जगातले सगळे चॅनल धावले, त्या आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच कळेल की कोण कुणावर भुंकतंय”, असं अरविंद सावंत म्हणाले.

“मी तर म्हणतो…”, ‘महाराष्ट्राचे प पू’ म्हणणाऱ्या शिंदे गटातील आमदारांना आदित्य ठाकरेंचं जाहीर आव्हान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे सरकारच बेकायदेशीर आहे. हे देवेंद्र फडणवीसांना कळतंय की हे सगळं बेकायदेशीर आहे. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण भाजपा देशात रुजवतेय. ते स्वत:चीच कबर खोदत आहेत. काल घडलेला प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही. महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. जे अलिबाबाचे ४० मित्र तिकडे गेले, त्यांना विचारायला हवं की त्यांना याची जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का? नितीन गडकरींचं किती खच्चीकरण केलं गेलं. त्यांचे पाय कापून टाकले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की या सरकारमध्ये सामील होणार नाही. दोन मिनिटांत दिल्लीवरून आदेश आला शपथ घ्या. घेतली त्यांनी शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं. सगळी खाती अंगाशी घेऊन यानं कारभार होणार नाही”, असंही अरविंद सावंत म्हणाले.