सामनातील व्यंगचित्रावरुन राजकारण सुरु असतानाच आता या व्यंगचित्रावरुन शिवसेनेतच दुफळी निर्माण झाली आहे. व्यंगचित्रामुळे नाराज झालेले बुलढाण्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार रायमूलकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामनामध्ये राज्यभरात निघणा-या मराठा क्रांती मोर्चाविषयी एक व्यंगचित्र छापून आले होते. या व्यंगचित्रावर मराठा समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. व्यंगचित्रातून समाजातील महिलांचा अवमान झाला अशी टीका सुरु झाली. या व्यंगचित्रावरुन  शिवसेनेच्या गोटातही नाराजी पसरली आहे. मिरजमधील एका तालुकास्तरावरील पदाधिका-याने व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याचे वृत्त होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु असतानाच मंगळवारी रात्री बुलढाण्यातील शिवसेना खासदार आणि दोन आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा पाठवल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

व्यंगचित्रावरुन व्यक्त होणा-या नाराजीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची बैठक पार पडली होती. या बैठकीत जनतेसमोर काय भूमिका मांडायची, रोषाला सामोरे कसे जायचे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडण्याबद्दल चर्चा केली करण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार खेडेकर आणि रायमूलकर हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीनंतरच त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. व्यंगचित्रावरुन उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली होती.  तर उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. व्यंगचित्र ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असे स्पष्टीकरण सुभाष देसाई यांनी दिले होते. त्यामुळे सामनातील व्यंगचित्र हे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena buldhana mp mla resigned
First published on: 27-09-2016 at 22:28 IST