महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख अशी उद्धव ठाकरेंची ओळख. पण, मूळात राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी त्यांच्या आयुष्याशी फार संबंध आला नाही. तीन भावापैकी सर्वात लहान असलेले उद्धव ठाकरे हे मूळात छायाचित्रकार. महत्त्वाच म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वभावही शिवसेनेच्या स्वभावाशी उलट. आईच्या स्वभावावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची ‘शैली’ आत्मसात करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. अगदी भाषणापासून ते बोलण्या-चालण्यापर्यंत… त्यामुळे अशा शांत संयमी स्वभावाच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं आली त्यावेळी सगळ्यानांची आपापले राजकीय अंदाज लावून टाकले की, शिवसेनेचं काही खरं नाही. हे स्वतः उद्धव ठाकरेंनीही बोलून दाखवलेलं आहे.

राजकारणात रस नसलेल्या उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमातूनच राजकारणाला सुरूवात केली. १९९०मध्ये उद्धव ठाकरे यांना शिशिर शिंदे यांनी कार्यक्रमासाठी बोलावलं. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांनी राजकारणाला सुरूवात केली, असं बोललं जात पुढे १९९४ पर्यंत उद्धव ठाकरेंनी बऱ्यापैकी पकड बनवली. पुढे १९९७ पासून नंतर झालेल्या बृह्नमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रियपणे कार्यरत झाले. त्यामुळे राज ठाकरे दुखावले गेले आणि पुढे बाजूलाही गेले. पुढे महाबळेश्वरमध्ये झालेल्या अधिवेशनानं शिवसेनेच्या राजकारणाची दिशा बदलली. बाळासाहेबानंतर राज ठाकरे असंच काहीसं कार्यकर्त्यांच्या मनात होतं. मात्र, कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली.

आणखी वाचा- …अन् त्याचवेळी ठरलं! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

साल २००३ आणि नंतरची आव्हान

यानंतर हळूहळू आधी नारायण राणे, नंतर राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. हे शिवसेनेला बसले मोठे धक्के होते. इथून पुढचा काळ उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक होता. २००७मध्ये बृह्नमुंबई महापालिकेची निवडणूक जिंकलेल्या शिवसेनेला २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आली नाही. शिवसेनेचे ४५ आमदार निवडून आले. त्यातच पुढे उद्धव ठाकरे यांचं ह्रदयाचं ऑपरेशन झालं. पुढे २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यानंतर देशात नरेंद्र मोदी यांच्या नावानं फेर धरला. देशातील राजकीय वाऱ्याची दिशा ओळखत उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत युती केली. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १९ खासदार लोकसभेत गेले. मात्र, त्यानंतर झालेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढली. राज्यातही मोदींचा करिश्मा दिसून आला, पण त्या लाटेतही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणत उद्धव ठाकरेंनी नेतृत्त्व सिद्ध केलं.

आणखी वाचा- अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा, पण चर्चा ट्विट केलेल्या फोटोची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९मध्ये भाजपा आणि शिवसेना दोन्ही निवडणुका एकत्र लढले. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं रणनीतीचं बदलली. कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीनं शिवसेनेनं सत्तेत अर्धा वाटा मागितला. पुढे तो मिळत नसल्याचं पाहुन वाट बदलली. ‘आलात तर सोबत नाहीतर, तुमच्याशिवाय’ अशा पद्धतीचं धोरण स्वीकारत उद्धव ठाकरेंनी शिवसेनाचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. जे अनेकांना भाजपाचं राज्यातील वजन वाढल्यानंतर अशक्य असं वाटत होतं. राज्यात अनपेक्षित असलेलं नवं राजकीय समीकरण उदयाला आणण्यात मोठी भूमिका उद्धव ठाकरेंनी बजावली. महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यासाठी उद्धव ठाकरेंची भूमिका महत्वाची होती असं काँग्रेस जाहीरपणे सांगते. मोठे धक्के बसल्यानंतर आज जिथे शिवसेना बसली आहे, त्यातून उद्धव ठाकरेंनी स्वतःतील संघटनात्मक बांधणीच्या कौशल्यानं ‘शिवसेनेचं पुढे काही खरं नाही’ हा लोकांचा एका दशकापूर्वीचा अंदाज सपशेल खोटा ठरवला.