एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची चर्चा सुरू असताना शिवसेनेत याआधीही नारायण राणेंनी केलेल्या बंडखोरीची जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून नारायण राणे आणि शिवसेनेतील वितुष्ट वाढतच गेलं आहे. गुरूवारी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.तसेच, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना लक्ष्य केलं. यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून नारायण राणेंना इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणेंनी या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं. “उद्धव ठाकरेंनी अमित शाहांनी जमीन दाखवा असं वक्तव्य केल्याचं म्हणाले. मात्र, त्याचा अर्थ त्यांना कळाला नाही. शाहांना जमिनीवर या असं म्हणायचं होतं. आता हे म्हणतात आम्ही ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत? शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते. तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते”, असं राणे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंना ६२ वं वर्ष सुरू आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विरोधकाच्या कानफडात तरी मारली का? पक्षवाढीसाठी कधी संघर्ष केला का? ते काहीच न करता सरळ मुख्यमंत्रीपदावर आले. तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत”, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

“…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते”, गटमेळाव्यातील टीकेवरून नारायण राणेंचा हल्लाबोल

“आम्हीही शिवसैनिकच आहोत, काहीही बोलू”

दरम्यान, यासंदर्भात बोलताना शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणेंना जाहीरपणे इशारा दिला आहे. “यांना समजत नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठं केलं आहे. उद्धव ठाकरेंविषयी उलट-सुलट बोलाल तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे, ती अजून वाढू देऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो, जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं.काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही जर मोठे झाले असाल, तर कुणामुळे झाले हे लक्षात ठेवा. यानंतर जास्त काही बोलू नका. तुम्ही वाईट बोललात तर आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही मग काहीही बोलू”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

“नारायण राणेंना मी सांगेन की त्यांनी बेकायदा घर बांधकाम केलं. एखादा सरपंच, नगरसेवकानं बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं. मग आता या खासदारानं जर बेकायदा बांधकाम केलं असेल, तर त्याच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली पाहिजे. त्या कारवाईच्या भीतीने दुसरंच काहीतरी करायचं आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायची असं चालू आहे”, असंही खैरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena chandrakant khaire slams narayan rane targeting uddhav thackeray rno news pmw
First published on: 24-09-2022 at 10:48 IST