शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. दोघांकडून टीझरही लॉंच करण्यात आले आहे. शिंदे गट आम्हीच बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असल्याचा दावा करते आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गट गद्दार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचा आरोप ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…”

रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

“शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो. पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात”, असा घणाघात ‘रोखठोक’ या सदरातून करण्यात आला आहे.

“हे डोके शिंदेंचे नाही”

“सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला. पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला”, असा आरोपही ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

हेही वाचा – “तुम्ही संपत्तीचे वारसदार, आम्ही बाळासाहेब आणि…”; गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

धर्मवीर चित्रपटावरून शिंदेंवर टीका

“महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे, तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले आहे”, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे.

“आनंद दिघेंची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली”

“एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते. त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती. त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती. त्यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यपद्धतीवर अनेकदा छापून आले, पण दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे”, असेही ‘रोखठोख’मध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena criticized cm eknath shinde in samara rokhathok article spb
First published on: 02-10-2022 at 10:13 IST