जवळपास तीन वर्षांपूर्वी अर्थात २०१९मध्ये राज्यात सत्तास्थापनेचं रंगलेलं महानाट्य सगळ्यांनीच पाहिलं. त्यावेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडी या राज्यासोबतच देशभरातील चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीची जोरदार चर्चा झाली होती. त्या शपथविधीचे अनेक किस्से अजूनही चर्चेत असतात. त्यातलाच एक किस्सा शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितला आहे. जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे आदी नेतेमंडळी देखील उपस्थित होती.

“मला काय माहीत शरद पवारच…”

गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाविषयी देखील भूमिका मांडली. “या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आम्ही व्यक्तीगत राजकारणाच्यावर विचारांच्या राजकारणाला महत्व दिलं. मी कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध बोलणारा कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस. पण मला काय माहीत शरद पवारच मला मंत्री करणार आहेत”, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

“राष्ट्रवादीनं काय जादू चालवली समजेना”

“आयुष्यभर आम्ही ज्या पक्षावर टीका करत राहिलो, त्या पक्षानं काय जादू चालवली आम्हालाही समजेना. आता सकाळची शपथच समजली नाही, तर दुपारची कशी समजेल?” असा मिश्किल प्रश्न देखील गुलाबराव पाटील यांनी केला.

“शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जोरदार टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते संग्रहीत चित्र नव्हतं, थेट चित्र होतं”

“ही जादू आहे काय? काही माणसांचं डोकं जादूगारासारखं बनतं कसं मला माहीत नाही. मी तर भारावून गेलो होतो. त्या वेळी रात्री १२ वाजता नाव जाहीर झालं आणि आम्ही सेलिब्रेट करत होतो. सकाळी पाहिलं तर.. मला लोक सांगायचे की ते संग्रहीत चित्र असेल. पण ते संग्रहीत चित्र नव्हतं.. थेट चित्र होतं. आम्ही काय.. १०-११ वाजेपर्यंत हॉटेलच्या खाली उतरतं कोण? पण नंतर पुन्हा शरद पवारांची जादू चालली. सुबह का भूला शामको वापस आये तो उसे भूला नहीं कहते. सगळे परत यायला लागले. या रे माझ्या बाळांनो, परत आपल्या घरट्याला या. योगायोगाने सरकार झालं. सरकार झाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला.. जो १९८२ साली पानटपरी चालवायचा, बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं आज मंत्री म्हणून आपल्यासमोर बोलतोय”, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.